नवी दिल्ली : शक्तिवर्धक औषधे घेतल्यामुळे दोन भारत्तोलकांच्या रक्ताचे नमुने पॉझिटिव्ह येताच जागतिक संस्थेकडून निलंबनाची टांगती तलवार डोक्यावर लटकणाऱ्या भारतीय वेटलिफ्टींग फेडरेशन अर्थात आयडब्ल्यूएफने या प्रकरणाची चौकशी तसेच सुनावणीसाठी पाच सदस्यीय समिती स्थापन केली आहे. तीन डिसेंबर रोजी सुनावणी होईल.पुण्यात नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल चॅम्पियनशीपदरम्यान भारताच्या दोन भारत्तोलक प्रमिला कृषाणी आणि मिनाती सेठी या डोप टेस्टमध्ये नापास झाल्या होत्या. त्यानंतर त्यांना वर्ल्ड फेडरेशन अंतर्गत होणाऱ्या सर्व स्पर्धांसाठी तात्पुरते निलंबित करण्यात आले होते. त्यामुळे २0 नोव्हेंबरला ह्यूस्टनमध्ये होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशीपमधून हटविण्यात आले होते.याबाबत महासचिव सहदेव यादव यांनी सांगितले की, यापूर्वीही अनेक जण उत्तेजक चाचणीत दोषी आढळले आहेत. पण या दोघी निर्दोष आहेत, असे मी पहिल्यांदा ठोसपणे सांगू इच्छितो. त्यामुळे यासाठी आम्ही समिती स्थापन केली आहे. आंतरराष्ट्रीय नियमानुसार एका कॅलेंडर वर्षात तीन पॉझिटीव्ह नमुने आले तर राष्ट्रीय महासंघावर एक वर्षाची बंदी लागू शकते. त्यामुळे आणखी एखादी घटना उजेडात आली तर पुढील वर्षी होणाऱ्या रियो आॅलिम्पिकमध्ये भारताच्या सहभागावर गदा येवू शकते. त्यादृष्टीने ही समिती काम करणार आहे.(वृत्तसंस्था)
डोपिंगप्रकरणी ५ सदस्यीय समितीची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2015 01:55 IST