साओ पावलो : इंग्लंड आणि उरुग्वे या संघांत फिफा विश्वचषकाच्या ड गटातील उद्या होणारा सामना हा दोन्ही संघांसाठी ‘करा अथवा मरा’ असाच होणार आहे. प्रारंभीचे सामने गमावल्यामुळे या प्रतिष्ठित स्पर्धेत आपल्या आशा जिवंत ठेवण्यासाठी दोन्ही संघांना विजय मिळवणे आवश्यक आहे.इंग्लंड संघाला सलामीच्या लढतीत इटली आणि उरुग्वेला कोस्टारिकाकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे या दोन्ही संघांना कोणतीही चूक महागात पडणार आहे. उद्या होणाऱ्या लढतीत झालेला पराभव हा राज हॉजसन यांचा इंग्लंड किंवा दोन वेळेसचा चॅम्पियन उरुग्वेला स्पर्धेबाहेर फेकू शकतो. उरुग्वेने पहिली लढत १-३ फरकाने गमावली होती. उरुग्वेचा स्टार स्ट्रायकर लुईस सुआरेज हा गुडघेदुखीच्या शस्त्रक्रियेनंतर सावरला असून तो उद्या खेळू शकतो. इंग्लिश प्रीमिअर लीगमध्ये सुआरेजने ३१ गोल केले होते आणि तो अव्वलस्थानी होता. इंग्लंडला इटलीने सलामीच्या लढतीत १-२ गोलने पराभव पत्करावा लागला. त्यांचा मॅन्चेस्टर युनायटेडचा हा २८ वर्षीय फॉरवर्ड वेन रुनी अद्याप अपेक्षेनुसार कामगिरी करू शकला नाही. त्यामुळे तो पुढील सामन्यात बाहेर बसवला जाण्याच्या चर्चेला ऊत आला आहे. अन्य नियमित खेळाडू मात्र सामन्यातील थकावटीतून सावरू इच्छित होते. इंग्लंडसाठी त्यांचा चिंतेचा विषय तो त्यांचा डिफेन्स आहे. सेंटर हाफ गॅरी काहील इटलीविरुद्ध मारियो बालाटेली याला रोखण्यात अपयशी ठरला होता. मारियो बालाटेलीने हेडरद्वारे गोल केला होता.उरुग्वेदेखील आपल्या डिफेन्समुळे चिंतित आहे. कोस्टारिकाच्या स्ट्रायकर अर्सेनलच्या जोएल कॅम्पबेल आणि पीएसपी एंडहोवेनचा ब्रायन रुईजने त्यांना सातत्याने अडचणीत आणले होते. याशिवाय संघाला बेनफिकाचा डिफेंडर मॅक्सी परेराचीदेखील उणीव भासेल. इंग्लंडला एडिन्सन कवानी आणि सुआरेज या स्ट्रायकर जोडीवर लक्ष ठेवावे लागेल. दोन्ही संघांत उरुग्वेने चार आणि इंग्लंडने तीन सामने जिंकले आहेत. (वृत्तसंस्था)
उरुग्वेच्या आव्हानासाठी इंग्लंड सज्ज
By admin | Updated: June 19, 2014 04:56 IST