बेंगळुरू : इंडियन प्रीमिअर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या आठव्या पर्वात अव्वल चारमधील स्थान अधिक मजबूत करण्यास उत्सुक असलेला रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघ बुधवारी किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध विजय मिळविण्यास प्रयत्नशील आहे. दुसऱ्या बाजूचा विचार करता सलग चार पराभव स्वीकारणाऱ्या पंजाब संघाचे लक्ष अपयशाची मालिका खंडित करण्यावर केंद्रित झाले आहे. गुणतालिकेत चौथ्या स्थानावर असलेल्या आरसीबी संघाला सोमवारी चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध २४ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. बुधवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीत विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाला विजयाचा प्रबळ दावेदार मानल्या जात आहे. किंग्स इलेव्हन पंजाब संघाला नऊ पैकी सात सामन्यांत पराभव स्वीकारावा लागल्यामुळे हा संघ प्ले आॅफमध्ये स्थान मिळविण्याच्या शर्यतीतून जवळजवळ बाहेर फेकला गेला आहे. आरसीबी संघाने ९ सामन्यांत ४ विजय मिळवले असून, ४ लढतींमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. आरसीबीच्या खात्यावर ९ गुणांची नोंद आहे. किंग्स इलेव्हन पंजाब संघ चार गुणांसह गुणतालिकेत तळाच्या स्थानावर आहे. आरसीबी संघासाठी बुधवारच्या लढतीत विजय मिळवणे आवश्यक आहे. यानंतर त्यांना पराभव स्वीकारावा लागला, तर त्यांचा प्लेआॅफमध्ये स्थान मिळवण्याचा मार्ग अधिक खडतर होईल. सुपरकिंग्सच्या ९ बाद १४८ धावसंख्येच्या प्रत्युत्तरात खेळताना आरसीबी संघाचा डाव १२४ धावांत संपुष्टात आला. ५.५ षटकांत २७ धावांच्या मोबदल्यात आरसीबी संघाने अखेरच्या ७ विकेट गमावल्या. आरसीबी संघाने गृहमैदानावर तीन पराभवानंतर कोलकाता नाईटरायडर्सविरुद्ध १० षटकांच्या लढतीत सरशी साधली होती. आरसीबीला सुपरकिंग्सविरुद्धच्या लढतीत संघाबाहेर असलेला ख्रिस गेल, एबी डिव्हिलियर्स, कोहली व मनदीपसिंग यांच्यासारख्या फलंदाजांकडून मोठ्या खेळीची आशा आहे. मिशेल स्टार्कच्या उपस्थितीत उर्वरित गोलंदाजांचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. गेल्या सामन्यात डेव्हिड वाईसी व हर्षल पटेल यांनी प्रत्येकी २ बळी घेतले होते. स्टार्कने २४ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले होते. दुसऱ्या बाजूचा विचार करता किंग्स इलेव्हनच्या संघाने ग्लेन मॅक्सवेल, डेव्हिड मिलर व शॉन मार्श यांना एकाचवेळी संधी न देण्याची योजना आखली आहे, पण त्याचा त्यांना विशेष लाभ झालेला नाही. गेल्या वर्षी उपविजेतेपद पटकावणाऱ्या या संघाच्या फलंदाजांची यंदाची कामगिरी निराशाजनक आहे. वीरेंद्र सेहवाग, मार्श व मॅक्सवेल यांच्यासारख्या फलंदाजांना आतापर्यंत छाप सोडता आलेली नाही. गोलंदाजांची कामगिरीही निराशाजनक ठरली आहे. मिशेल जॉन्सन सपशेल अपयशी ठरला आहे. वेगवान गोलंदाज संदीप सिंग व फिरकीपटू अक्षर पटेल यांचा अपवाद वगळता किंग्स इलेव्हनच्या अन्य गोलंदाजाना प्रतिस्पर्धी संघांच्या फलंदाजांवर छाप सोडता आलेली नाही. (वृत्तसंस्था)हेड टू हेडरॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरूआणि किंग्ज इलेव्हन पंजाब या दोन्हींमध्ये आतापर्यंत १४ लढती झाल्या आहेत. यामध्ये बंगळुरू संघाने ५ व पंजाब संघाने ९ विजय मिळविले आहेत. किंग्ज इलेव्हन पंजाबजॉर्ज बेली (कर्णधार), अक्षर पटेल, अनुरित सिंग, बुरान हेंडरिक्स, डेव्हिड मिलर, ग्लेन मॅक्सवेल, गुरकीरतसिंग मान, करणवीर सिंग, मनन वोरा, मिचेल जॉन्सन, परविंदर आवाना, ऋषी धवन, संदीप शर्मा, शार्दुल ठाकुर, शिवम शर्मा, शॉन मार्श, थिसारा परेरा, वीरेंद्र सेहवाग, वृद्धिमान साहा, मुरली विजय, निखिल नाईक आणि योगेश गोवलकर. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, ख्रिस गेल, दिनेश कार्तिक, एस. बद्रिनाथ, डॅरेन सॅमी, मिशेल स्टार्क, निक मेडिन्सन, वरुण आरोन, युजवेंद्र चहल, रिली रोसोयु, विजय झोल, योगेश ताकवले, अबु नेचिम अहमद, हर्षल पटेल, अशोक डिंडा, संदीप वॉरियर, मनविंदर बिस्ला, इक्बाल अब्दुल्ला, सीन एबट, अॅडम मिल्न, डेव्हिड वीस, जलज सक्सेना, सर्फराज खान, शिशिर बवाने.
आरसीबी असणार विजयाच्या प्रयत्नात
By admin | Updated: May 6, 2015 02:59 IST