नवी दिल्ली : रिओ आॅलिम्पिकमध्ये रौप्यविजेती पी. व्ही. सिंधू आणि कांस्यविजेती साक्षी मलिक यांच्यासह देखणी कामगिरी करणाऱ्या काही खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव होत आहे. मात्र, अपयशी ठरलेल्या अन्य खेळाडूंच्या कामगिरीचे पोस्टमार्टम सुरू झाले आहे. दरम्यान, जी आकडेवारी पुढे आली, त्यावरून खेळाडूंनी तयारीसाठी मननामी पद्धतीने खर्च केल्याचे निष्पन्न झाले आहे.रिओ आॅलिम्पिक आटोपून १० दिवस झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील तीन आॅलिम्पिकसाठी विशेष कृती दल स्थापण्याची घोषणा केली. दुसरीकडे, रिओतील कामगिरीचे पोस्टमार्टम सुरू झाले; पण या स्पर्धेसाठी खेळाडूंच्या तयारीवर जो खर्च झाला, त्याची आश्चर्यकारक आकडेवारी पाहून अनेकांना धक्का बसणे स्वाभाविक आहे. अनेकांनी मनमानी पद्धतीने पैसा मागितला. त्यांना पैसा मिळालादेखील; पण त्यांनी कामगिरी मात्र अपेक्षेनुरूप झालीच नाही. त्यांच्या तुलनेत पदकविजेत्या खेळाडूंनी आपल्या प्रशिक्षणावर फार थोडा खर्च केला आणि त्यांची कामगिरी मात्र शानदार राहिली. कांस्यविजेती महिला मल्ल साक्षी मलिक हिने टार्गेट पोडियम योजनेअंतर्गत (टॉप) केवळ १२ लाख रुपये खर्च केले. रौप्यविजेती बॅडमिंटन खेळाडू सिंधूवर ४४ लाखांचा खर्च झाला. महिला जिम्नॅस्ट दीपा कर्माकर हिच्यावर केवळ दोन लाख रुपये खर्च झाले. दीपाला आपल्या पसंतीच्या देशात सराव करण्याची सरकारने मुभा दिली होती; पण तिने कोच बिश्वेश्वर नंदी यांच्या मार्गदर्शनात नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी स्टेडियममध्येच सराव केला. या तिन्ही खेळाडूंचे कोच भारतीय होते, हे विशेष. वादग्रस्त वेगवान धावपटू द्युती चंद हिला ३० लाख रुपये देण्यात आले, तरीही आपल्याकडे धावण्यासाठी जोडे नाहीत, अशी ओरड करून तिने मीडियाचे लक्ष वेधले होते. साईने तिला नंतर दोन लाख रुपयांची अतिरिक्त मदत केली. थाळीफेकपटू कृष्णा पुनिया जखमेमुळे दोन वर्षे मैदानापासून दूर होती. राजस्थानमध्ये तिने निवडणूक लढविली. नंतर अमेरिकेत सरावासाठी तिने सरकारकडे ४० लाखांची मागणी केली. तिला ही रक्कम मंजूर करण्यात आली होती; पण ती आॅलिम्पिकसाठी पात्रदेखील ठरू शकली नव्हती.हिना सिद्धू हिला पती रौनक पंडित यांच्यासोबत सराव करण्यासाठी एक कोटी मिळाले, पण ती दोन्ही स्पर्धांमध्ये १० व्या, तसेच २५ व्या स्थानावर घसरली. इतकेच नव्हे, तर खेळाडूंनी आपल्या कुटुंबीयांनादेखील रिओला नेण्यासाठी फार जबरदस्त फिल्डिंग लावली होती. सानियाची आई, टेनिस संघाची व्यवस्थापक, गोल्फर आदिती अशोक हिचे वडील, मॅलेट सहकारी, थाळीफेकपटू सीमा पुनियाचे पती अंकुश, तिचे कोच होते. पायी चालण्याच्या शर्यतीत सहभागी झालेल्या सपना पुनिया आणि गोळाफेकपटू मनप्रीत कौर यांच्यासोबत त्यांचे पती पोलंडमधील सरावाच्यावेळी सोबत होते. विकासने आपल्या वडिलांना कोच जॉन गुडिना यांच्या जागी रिओला नेले. या सर्वांवर खर्च केला तो सरकारनेच!भारताचे ११७ खेळाडूंचे पथक केवळ दोन पदकांसह परतले. खेळाडूंकडून त्यांचा सराव आणि कामगिरी याचा लेखाजोखा घेण्याचीही आणि प्रसंगी त्यांना धारेवर धरण्याची जबाबदारीदेखील सरकारचीच आहे.
आॅलिम्पिकपटूंची आर्थिक ‘मनमानी’
By admin | Updated: September 1, 2016 05:03 IST