ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १९ - इंग्लंड दौ-यातील दारुण पराभवासाठी बीसीसीआये प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांना बळीचा बकरा बनवत त्यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. येत्या महिनाभरात फ्लेचर यांना नारळ दिला दिला जाणार असून रवि शास्त्री यांच्याकडेच संघाची सर्व सूत्र सोपवली जाणार आहे. मात्र कर्णधार महेंद्रसिंह धोनी व सुमार कामगिरी करणा-या अन्य खेळाडूंवर बीसीसीआय आणखी किती वेळ कृपादृष्टी दाखवणार असा सवाल उपस्थित होत आहे.
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताला ३-१ असा दारुण पराभव स्वीकारावा लागला. २०११ पासून परदेश दौ-यात भारतीय संघ सपाटून मार खात आहे. माजी क्रिकेटपटूंनीही कर्णधार आणि संघातील अन्य खेळाडूंच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. यापार्श्वभूमीवर बीसीसीआयने संघात काही बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंड दौ-यातील निराशाजनक कामगिरीसाठी प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांची पहिली विकेट जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. महिनाभरात त्यांची हकालपट्टी केली जाईल. मंगळवारी बीसीसीआयने रवि शास्त्री यांना एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाच्या संचालकपदी नेमले होते. रवि शास्त्रींची नेमणूक करुन बीसीसीआयने फ्लेचर यांना साईडिंगला टाकल्याची चर्चा रंगली आहे. तर क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीसाठी नेमलेल्या प्रशिक्षकांनाही सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. त्यांच्याजागी संजय बांगर आणि भारत अरुण यांची सहाय्यक प्रशिक्षक म्हणून नेणूक करण्यात आली आहे.