मेलबोर्न : जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू सर्बियाचा नोव्हाक जोकोविच, अमेरिकेची सेरेना विल्यम्स व स्वित्झर्लंडचा स्टार खेळाडू स्टेनिसलास वावरिन्का यांनी आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये आपले विजयी अभियान कायम राखताना चौथ्या फेरीत मजल मारली़जोकोविच याने तिसऱ्या फेरीच्या सामन्यात स्पेनच्या फर्नांडो वरदास्कोवर ७-६, ६-३, ६-४ अशी मात करून चौथ्या फेरीत प्रवेश केला़ पुढच्या फेरीत जोकोविचचा सामना लॅग्जम्बर्गच्या जाईल्स म्युलरशी होणार आहे़जोकोविचला पहिला सेट जिंकण्यासाठी टायब्रेकपर्यंत झुंजावे लागले़ मात्र, टायब्रेक १०-८ ने जिंकल्यानंतर त्याने मागे वळून न पाहता सामन्यात बाजी मारली़ जोकोविचने हा सामना २ तास आणि २१ मिनिटांपर्यंत चालला़ आपला किताब कायम राखण्यासाठी इच्छुक असलेल्या वावरिन्काने फिनलंडच्या जार्को निमिनेनचा तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत ६-४, ६-२, ६-४ अशा फरकाने फडशा पाडून पुढची फेरी गाठली़ वावरिन्काला चौथ्या फेरीत आता स्पेनच्या गार्सिया लोपेजचा सामना करावा लागेल़ छुपा रुस्तुम अशी ओळख असणाऱ्या जपानच्या केई निशिकोरी याने अमेरिकेच्या स्टीव्ह जॉन्सनवर ६-७, ६-१, ६-३, ६-३ असा विजय मिळविला, तर कॅनडाच्या मिलोस राओनिक याने जर्मनीच्या बेंजामिन बेकरवर ६-४, ६-३, ६-३ अशी सरशी साधली़ मुगुरेजा हिने अन्य लढतीत स्वित्झर्लंडच्या टिमिया बाशिनज्कीला ६-३, ५-६, ६-० ने पराभूत केले़ महिला गटात सेरेना हिने लौकिकाला साजेसा खेळ करताना युक्रेनच्या एलिना स्वितोलिनाचे आव्हान ४-६, ६-२, ६-० अशा फरकाने मोडून काढले आणि थाटात स्पर्धेच्या चौथ्या फेरीत आपले स्थान निश्चित केले़ सेरेनाला पुढच्या फेरीत स्पेनच्या गारबाईन मुगुरेजाचा सामना करावा लागणार आहे़सानिया दुसऱ्या फेरीतभारताची सानिया मिर्झा हिने आॅस्ट्रेलियन ओपनच्या मिश्र दुहेरीत शानदार विजय मिळवून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला़ मात्र, अनुभवी टेनिसपटू महेश भूपतीला जोडीदारासह मात खावी लागली़ सानियाने ब्राझीलच्या ब्रुनो सोरेससह मिश्र दुहेरीच्या पहिल्या फेरीत हंगेरीच्या टिमिया बाबोस आणि अमेरिकेचा एरिक बुटारेक या जोडीवर ५७ मिनिटांत ६-१, ४-६, १०-३ अशा फरकाने विजय मिळवून दुसरी फेरी गाठली़ भूपतीला स्लोव्हाकियाच्या जर्मिला गाजदोसोव्हासह चिनी-तैपेईचे हाओ चिंग चान आणि जेमी मरे यांच्याकडून ६-४, ६-७, ८-१० अशा फरकाने पराभवाची नामुष्की ओढावली़ (वृत्तसंस्था)
जोकोविच, सेरेना, वावरिन्का विजयी
By admin | Updated: January 25, 2015 02:02 IST