मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सोमवारी होणाऱ्या ८६ व्या वार्षिक आमसभेमध्ये बोर्डाची प्रतिमा सुधारण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्याबाबत चर्चा होणार असून, आयसीसीचे चेअरमन एन. श्रीनिवासन यांच्या भविष्याबाबतचा महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. बोर्डाच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी नैतिक अधिकाऱ्याच्या नियुक्तीबाबत चर्चा होणार आहे. ‘नैतिक अधिकारी’ नियुक्तीबाबतचा प्रस्ताव बीसीसीआयच्या ‘मेमोरेंडम आॅफ रुल्स अॅण्ड रेग्युलेशन’मध्ये ठेवण्यात आला असून, त्यावर सोमवारी होणाऱ्या एजीएममध्ये चर्चा होणार आहे. सर्वोच्च न्यायालयातर्फे नियुक्त करण्यात आलेली लोढा समिती संघटनेच्या संचालनात सुधारणा करण्याबाबत शिफारस करण्याची शक्यता आहे. त्यामुळे बोर्डाचे सदस्य लोकपाल किंवा नैतिक अधिकारी यांच्या नियुक्तीसाठी मार्ग मोकळा करण्याची तयारी करीत आहे. याची घोषणा शशांक मनोहर यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदी पुन्हा निवड झाल्यानंतर केली होती.एखाद्या प्रशासकाविरुद्ध दुटप्पी भूमिका, शिस्तभंग किंवा नियमांचे उल्लंघन यासारख्या तक्रारीविरुद्ध निर्णय घेण्यासाठी लोकपालची नियुक्ती महत्त्वाची ठरणार आहे. एजीएममध्ये सीनिअर, ज्युनिअर आणि महिला संघांची निवड करण्यासाठी नव्या समितींची नियुक्ती करण्यात येईल. त्याचप्रमाणे आयपीएलच्या नव्या संचालन परिषदेची स्थापना करण्यात येईल. याव्यतिरिक्त निलंबित चेन्नई सुपरकिंग्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांच्या स्थानी आयपीएलच्या नवव्या व दहाव्या पर्वासाठी दोन नव्या संघांच्या समावेशाबाबात निर्णय होण्याची शक्यता आहे. उपसमितीमध्ये सदस्यांची संख्या आठपर्यंत मर्यादित ठेवण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे राजीव शुक्ला यांच्या अध्यक्षतेखालील आयपीएल संचालन परिषदेच्या सदस्यांच्या संख्येमध्ये कपात होण्याची शक्यता आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाली, तर आयपीएल संचालन परिषदेमध्ये भविष्यात बोर्डाचे पाच सदस्य असतील. याव्यतिरिक्त अर्थ आणि प्रशासनामध्ये बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश राहील. आयपीएलचे सर्व निर्णय बहुमताच्या आधारावर घेतले जातात. त्यात टाय असेल, तर अध्यक्ष आपल्या निर्णायक मताचा वापर करू शकतो. संचालन परिषदेकडे आयपीएलसाठी वेगळे अकाऊंट राहणार असून, त्याचे संचालन बीसीसीआयचे कोषाध्यक्ष करतील. (वृत्तसंस्था) बीसीसीआयच्या आमसभेमध्ये बोर्डाचे माजी अध्यक्ष व तमिळनाडूचे अनुभवी प्रशासक एन. श्रीनिवासन यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेमध्ये बीसीसीआयचे प्रतिनिधी म्हणून कायम ठेवण्यात येईल किंवा नाही, याबाबत उत्सुकता आहे. आयसीसीमध्ये बीसीसीआयचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मनोहर उत्सुक असल्याचे वृत्त आहे. नियमांमध्ये महत्त्वाचा बदल होण्याची शक्यता आहे. त्यात राष्ट्रीय निवड समितीतर्फे निवडण्यात येणाऱ्या प्रत्येक संघाला अध्यक्षाची स्वीकृती असणे आवश्यक राहील.
‘श्रीनिं’च्या भविष्यावर चर्चा
By admin | Updated: November 8, 2015 23:45 IST