नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून प्रदीर्घ कालावधी न मिळाल्याने खूप निराश झालो होतो आणि त्यातून सावरणे खूपच कठीण होते, असा गौप्यस्फोट केला आहे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेला भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याने.तेंडुलकरवर त्याच्या २४ वर्षांच्या चमकदार कारकिर्दीदरम्यान दोनदा कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली; परंतु त्यात तो फारसा यशस्वी ठरला नाही. तो पहिल्यांदा १९९६ मध्ये कर्णधार झाला; परंतु संघाच्या सुमार कामगिरीमुळे त्याला १९९७ मध्ये या पदावरून हटवण्यात आले. तथापि, कर्णधार म्हणून प्रदीर्घ कालावधी न मिळाल्याची खंत सचिन तेंडुलकरने शुक्रवारी व्यक्त केली.तेंडुलकर म्हणाला, ‘‘क्रिकेट हा वैयक्तिक नसून सांघिक खेळ आहे. एक वेळ येते तेव्हा कर्णधार त्याची भूमिका बजावतो. तो मैदानावर महत्त्वपूर्ण निर्णय घेतो; परंतु अखेर फलंदाजांनाच धावा उभाराव्या लागतात आणि गोलंदाजांना योग्य दिशेने गोलंदाजी करावी लागते. कर्णधारपद भूषवण्याच्या माझ्या सुरुवातीच्या कालखंडातील १२ ते १३ महिन्यांनंतर पदावरून हटवण्यात आले, ही बाब निराशाजनक होती. कारण तुम्ही संघाला पुढे न्याल, या विचारानेच तुम्हाला कर्णधार बनवले जाते आणि जर तुमचा कार्यकाळ प्रदीर्घ नसला तर यशाचा दर शून्य होतो. तुम्ही चार सामने खेळता आणि त्यातील दोन सामने जिंकलात तर तुमच्या यशाचा दर ५० टक्के होते. कर्णधार म्हणून माझा कालावधी प्रदीर्घ नव्हता आणि त्यातून सावरणे माझ्यासाठी खूपच मोठे आव्हान होते.’’सचिन तेंडुलकरने २०१३ मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याने त्याच्या नेतृत्वाची तुलना भारताच्या २०११ च्या इंग्लंड आणि आॅस्ट्रेलिया दौऱ्याशी केली. तेंडुलकरला सध्या आॅस्ट्रेलिया व न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेत कोणता संघ जिंकेल? असा प्रश्न छेडण्यात आला तेव्हा तो म्हणाला, ‘‘भारताची सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावण्याकडे वाटचाल सुरू आहे. भारत ज्याप्रमाणे खेळत आहे त्यावर आपण खूप प्रभावित आहोत. आम्ही चांगली गोलंदाजी करीत आहोत आणि फलंदाजी व क्षेत्ररक्षणही चांगले होत आहे. असा कोणताही विभाग नाही, की ज्यात आमची कामगिरी खराब होत आहे. आम्ही सातत्याने चांगली कामगिरी करीत आहोत.’’तेंडुलकर फलंदाजांसाठी अनुकूल असलेल्या वनडेतील नियमात झालेल्या बदलाबाबत जास्त खूश नाही.तो म्हणाला, की क्रिकेटमध्ये बदल होत आहे आणि हे बदल गोलंदाजांसाठी जास्त कठोर आहेत. जेव्हा सर्कलच्या आत पाच क्षेत्ररक्षक होते तेव्हा स्कोर २६० किंवा २७० पर्यंत पोहोचत होता. आता ही धावसंख्या ३१० पर्यंत पोहोचली आहे. एवढेच नव्हे; तर २९० धावांचाही यशस्वीपणे पाठलाग होऊ शकतो, असे समालोचक म्हणतात. (वृत्तसंस्था)
कर्णधारपद प्रदीर्घ कालावधीत न मिळाल्याने निराश : तेंडुलकर
By admin | Updated: March 14, 2015 00:07 IST