मुंबई : महेंद्रसिंग धोनी आगामी विश्वकप स्पर्धेत संघाला विजेतेपद मिळवून देण्यात अपयशी ठरला तर तो वन-डे क्रिकेटमधूनही निवृत्ती स्वीकारू शकतो, असे मत कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारणाऱ्या धोनीचे सुरुवातीला मेंटर असलेले केशव रंजन बॅनर्जी यांनी व्यक्त केले. राची येथे मेकोन मैदानावर गोलकिपिंग करणाऱ्या धोनीमध्ये भविष्यातील क्रिकेटपटू शोधणारे रंजन म्हणाले, ‘१९९१ मध्ये माझी त्याच्यावर नजर पडली. त्यावेळी तो गोलकिपिंग करीत होता. मी त्याला क्रिकेटकडे लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर १९९९ मध्ये त्याने क्रिकेटपटू म्हणून ओळख निर्माण केली.’धोनीच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारण्याच्या निर्णयावर बोलताना बॅनर्जी म्हणाले, ‘पाच दिवस दडपणाखाली खेळण्याची त्याची मानसिकता नव्हती. तो स्वत:च्या मनाचा मालक आहे. त्याच्याकडे निर्णय घेण्याची क्षमता आहे. जर एखादी बाब त्याने न करण्याच्या ठरविले तर त्याबाबत तो पुन्हा विचार करीत नाही. जर विश्वकप स्पर्धेत तो संघाला विजेतेपद मिळवून देण्यात अपयशी ठरला तर तो वन-डे क्रिकेटमधूनही निवृत्ती स्वीकारू शकतो.’ भारतीय वन-डे संघाचा कर्णधार धोनी कमी बोलणारा आहे. त्याने कठोर परिश्रम घेतले असून त्याला नशिबाची जोड मिळाल्यामुळे कर्णधार झाला, असेही बॅनर्जी म्हणाले. (वृत्तसंस्था)
धोनी मनाचा राजा आहे : मेंटर
By admin | Updated: January 2, 2015 02:15 IST