नवी दिल्ली : भारताचा सलामीचा फलंदाज आणि पार्टटाईम आॅफस्पिनर शिखर धवन याच्या द. आफ्रिकेविरुद्ध चौथ्या आणि अखेरच्या कसोटीत केलेली गोलंदाजी संशयास्पद ठरली आहे. त्याला १४ दिवसांच्या आत गोलंदाजी परीक्षण करावे लागेल.आयसीसीने बुधवारी याची माहिती दिली. सोमवारी संपलेल्या कसोटी सामन्यानंतर धवनविरुद्ध तक्रार नोंदविण्यात आली होती. गोलंदाजीचा निकाल येईपर्यंत धवन आंतरराष्ट्रीय सामन्यात गोलंदाजी करीत राहील. सामनाधिकाऱ्यांनी धवनच्या गोलंदाजीचा अहवाल बीसीसीआयकडे सोपविला असून त्यात संशयास्पद शैलीची तक्रार करण्यात आली. त्याने कोटलावर तीन षटके गोलंदाजी केली. त्यात नऊ धावा दिल्या, पण एकही गडी बाद करता आला नव्हता. भारताने हा सामना ३३७ धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला, शिवाय मालिका ३-० ने खिशात घातली होती. धवनशिवाय यंदा संशयास्पद शैलीत अडचणीत आलेले वेस्ट इंडिजचे सुनील नारायण, मर्लोन सॅम्युअल्स, पाकचा मोहम्मद हफिज, बिलाल आसिफ, लंकेचा थारिंडू कौशल, झिम्बाब्वेचा माल्कम वॉलर यांचा समावेश आहे. संशयास्पद शैलीत दोषी आढळताच नारायण आणि हफिज यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे.(वृत्तसंस्था)
धवनची ‘फिरकी’ संशयास्पद
By admin | Updated: December 10, 2015 01:01 IST