ऑनलाइन लोकमत दिल्ली, दि. २३ - कर्णधार जेपी डयुमिनीच्या तडाखेबंद नाबाद ७८ धावा आणि श्रेयस अय्यरच्या ८३ धावांच्या जोरावर दिल्लीने मुंबई इंडियन्ससमोर १९१ धावांचे आव्हान ठेवले आहे. दिल्लीने घरच्या फिरोजशहा कोटला मैदानावर टॉस हारल्यानंतरही अफलातून फलंदाजी केली. सलामीला आलेल्या श्रेयस अय्यरने अवघ्या ५६ चेंडूत ७ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ८३ धावांची खेळी केली. त्यानंतर आलेला कर्णधार जेपी ड्युमिनीने श्रेयस अय्यरप्रमाणेच मोठे फटके लगावले. जेपीने ५० चेंडूत नाबाद ७८ धावा चोपल्या. यामध्ये त्याने ३ चौकार आणि ६ उत्तुंग षटकार ठोकले. मयांक अग्रवालला या सामन्यात सूर गवसला नाही तो अवघ्या एका धावेवर बाद झाला. मॅथ्यूजने १७ धावा केल्या. युवराज सिंग या सामन्यात अपयशी झाला त्याला केवळ २ धावा करता आल्या. दिल्लीने २० षटकात ४ गडी गमावत १९० धावा केल्या.
दिल्लीचे मुंबई इंडियन्ससमोर १९१ धावांचं आव्हान
By admin | Updated: April 23, 2015 21:43 IST