ऑनलाइन लोकमत
रायपूर, दि. 20 - दिल्ली डेअरडेव्हिल्सनं शानदार खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादवर 6 गडी राखून विजय मिळवला आहे. दिल्ली डेअरडेव्हिल्सनं निर्धारित 20 षटकांत 4 गड्यांच्या मोबदल्यात 161 धावा केल्या. दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून के के नायरनं नाबाद खेळी करत 8 चौकारांसह 3 षटकार खेचत अर्धशतक पार करून 83 धावांपर्यंत मजल मारली आहे. तर पंत 32 धावा काढून धावबाद झाला. ड्युमिनी 17, ब्रेथवेट 10 धावा काढून तंबूत परतले. पंत आणि नायर या जोडीनं 73 धावांची भागीदारी केलीय.
त्यापूर्वी, दिल्लीकरांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले होते. डेव्हिड वॉर्नरने केलेल्या शानदार 73 धावांच्या कॅप्टन्स इनिंग्जच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने दिल्ली डेअरडेव्हिल्स विरुद्ध 20 षटकांत 7 बाद 158 धावा उभारल्या. कार्लोस ब्रेथवेटने घेतलेल्या दोन महत्त्वपूर्ण बळींमुळे हैदराबादच्या धावसंख्येला ब्रेक लावण्यात दिल्लीला यश आले. अष्टपैलू कार्लोस ब्रेथवेटच्या 6व्या षटकातील अखेरच्या चेंडुवर धवनने मारलेला फटका ब्रेथवेटने अडवला. यावेळी धवन क्रीझ सोडून खूप पुढे आलेला आणि मिळालेली संधी अचूकपणे हेरुन ब्रेथवेटने त्याला धावबाद केले. यानंतर पुढच्याच षटकात फिरकीपटू अमित मिश्राने आपल्याच गोलंदाजीवर दीपक हूडाला धावबाद करुन हैदराबादाला दुसरा धक्का दिला.
या दोन धक्क्यानंतर हैदराबादच्या धावसंख्येला खीळ बसली. मात्र वॉर्नरने एकबाजू लावून धरताना संघाची धावसंख्या वाढवण्यावर भर दिला. परंतु दहाव्या षटकात युवराज (11 चेंडूत 10 धावा) ब्रेथवेटच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाल्याने हैदराबादच्या अडचणीत भर पडली. वॉर्नरने 56 चेंडूत 8 चौकार व एका षटकारासह 73 धावा काढल्या. ब्रेथवेटने त्याचा बळी घेत हैदराबादला रोखण्यात मोलाची भूमिका बजावली. मोइसेस हेन्रीकेज, इऑन मॉर्गन, नमन ओझा यांनी फारशी चमक दाखवता आली नाही.