मॅनहिम (अमेरिका) : पहिल्या सामन्यात झालेल्या निसटत्या पराभवाचा वचपा काढताना भारतीय महिला हॉकी संघाने यजमान अमेरिका महिला हॉकी संघाला २-१ असे नमवले. रिओ आॅलिम्पिकची पूर्वतयारी म्हणून अमेरिका दौऱ्यावर गेलेल्या भारतीय महिलांनी यासह आत्मविश्वास मिळवला.याआधीच्या सामन्यात झुंजार खेळ करूनही मोक्याच्यावेळी झालेल्या चुकांमुळे भारताचा पराभव झाला. या वेळी मात्र भारतीयांनी चुका सुधारताना यजमानांवर वर्चस्व मिळवण्यात यश मिळवले. सामन्यातील पहिला क्वार्टर गोलशून्य बरोबरीत राहिल्यानंतर दुसऱ्या क्वार्टरच्या १९व्या मिनिटाला जिल विटमरने पेनल्टी कॉर्नर सत्कारणी लावत अमेरिकेला १-० असे आघाडीवर नेले. तिसऱ्या क्वार्टरमध्ये प्रीतीने ४५व्या मिनिटाला महत्त्वपूर्ण गोल करून भारताला बरोबरी साधून दिली. या गोलमुळे आत्मविश्वास उंचावलेल्या भारताने यजमानांवर दबाव टाकला. अंतिम क्वार्टरमध्ये ५५व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर लिलिमाने निर्णायक गोल करुन भारताचा विजय निश्चित केला. (वृत्तसंस्था)
पराभवाचा वचपा काढला
By admin | Updated: July 22, 2016 03:29 IST