नवी दिल्ली : रिओ पॅरालिम्पिक स्पर्धेतील रौप्यपदकविजेती खेळाडू दीपा मलिक हिचे मायदेशात जोरदार स्वागत झाले. दिल्लीतील इंदिरा गांधी विमानतळावर ढोल आणि नगारे वाजवून दीपा मलिकचे स्वागत केले गेले. पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताला पदक मिळवून देणारी पहिली महिला अॅथलिट ठरण्याचा मान दीपाने पटकावला. तिने थाळीफेक एफ ५३ मध्ये रौप्यपदक मिळवले. विमानतळावर पोहोचताच कुटुंबीय तसेच खेळाडूंनी तिचे स्वागत केले. ती म्हणाली, ‘‘मला खूप अभिमान वाटत आहे. जे पदक माझ्या हातात आहे हे सत्य आहे आणि त्याने मी आनंदित आहे.’’दीपाने शॉटपूट स्पर्धेत आपले वैयक्तिक सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करीत ४.६१ मीटरचे अंतर नोंदवले आणि रौप्यपदक पटकावले. या स्पर्धेतील सुवर्णपदक बहारिनच्या फात्मा नेदाम आणि कांस्य ग्रीसच्या दिमित्रा कोरोकिडा यांना मिळाले.अर्जुन पुरस्कारविजेती दीपाला कंबरेपासून खाली पक्षाघात झाला आहे. सैन्य दलातील अधिकाऱ्याची पत्नी असलेल्या दीपा हिला दोन मुली आहेत. १९९९ मध्ये मणक्याचा ट्युमर झाला होता. त्यानंतर तिचे दोन्ही पाय लकवाग्रस्त झाले. सहा वर्षांनंतर तिने पॅरा खेळात उतरण्याचा निर्णय घेतला. दीपा भालाफेक आणि जलतरण स्पर्धेचाही भाग होती. (वृत्तसंस्था)
दीपाचे मायदेशात जोरदार स्वागत
By admin | Updated: September 18, 2016 05:40 IST