मोहाली : आयपीएलच्या सातव्या पर्वात यापूर्वीच प्ले-आॅफमधील स्थान निश्चित करणारा किंग्ज इलेव्हन पंजाब आणि गुणतालिकेत तळाच्या स्थानावर असलेला दिल्ली डेअरडेव्हिल्स यांच्या दरम्यान रविवारी खेळल्या जाणार्या लढतीला विशेष महत्त्व नसले, तरी यजमान संघ या लढतीत विजय मिळवित गुणतालिकेतील अव्वल स्थान कायम राखण्यास उत्सुक आहे. आयपीएलच्या सातव्या पर्वात सर्वांत बलाढ्य संघ म्हणून ओळखल्या जाणार्या किंग्ज इलेव्हनने १३ पैकी १० सामन्यांत विजय मिळवत २० गुणांची कमाई केली. गुणतालिकेत पंजाब संघ अव्वल स्थानवर आहे. दुसर्या बाजूचा विचार करता केवळ दोन सामन्यांत विजय मिळविणारा दिल्ली संघ गुणतालिकेत तळाच्या स्थानावर आहे. किंग्ज इलेव्हनने शुक्रवारी राजस्थान रॉयल्सविरुद्ध १६ धावांनी विजय मिळविताना वर्चस्व कायम राखले. दिल्ली संघाला शुक्रवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध १५ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. संघर्ष करीत असलेल्या दिल्ली संघाला रविवारीच्या लढतीत बलाढ्य पंजाब संघाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. मनन व्होरा, ग्लेन मॅक्सवेल, डेव्हिड मिलर, वीरेंद्र सेहवाग आणि कर्णधार जॉर्ज बेली यांच्या समावेशामुळे पंजाब संघाची फलंदाजीची बाजू मजबूत झाली आहे. राखीव खेळाडूंमध्ये समावेश असलेल्या क्रिकेटपटूंनीही मिळालेल्या संधीचे सोने केले. शुक्रवारी लेगस्पिनर करणवीर सिंगने चमकदार कामगिरी करीत १६ धावांच्या मोबदल्यात २ बळी घेतले. युवा गोलंदाज अक्षर पटेल, ऋषी धवन आणि संदीप शर्मा यांनी कामगिरीत सातत्य राखले आहे. प्ले-आॅफमधील स्थान निश्चित करणार्या पंजाब संघाला रविवारी खेळल्या जाणार्या लढतीच्या निमित्ताने राखीव खेळाडूंची क्षमता तपासण्याची संधी मिळाली आहे. दरम्यान, दिल्ली संघाला या मोसमात अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आहे. दिल्ली संघातील खेळाडूंना सांघिक कामगिरी करण्यात अपयश आले. गोलंदाजांनी सपशेल निराशा केली. दिल्ली संघाची भिस्त कर्णधार केव्हिन पीटरसन, जेपी ड्युमिनी आणि दिनेश कार्तिक यांच्या कामगिरीवर अवलंबून आहे. मुरली विजय, मनोज तिवारी, रॉस टेलर आणि क्विन्टन डिकॉक यांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. मोहम्मद शमी, वेन पार्नेल आणि जयदेव उनाडकट यांना गोलंदाजीमध्ये छाप सोडता आलेली नाही. फिरकीपटू इम्रान ताहिरने मुंबईविरुद्ध तीन बळी घेत उपयुक्तता सिद्ध केली. (वृत्तसंस्था)
अव्वल स्थान राखण्यास उत्सुक
By admin | Updated: May 25, 2014 04:28 IST