-हर्षा भोगले खेजीवनात चांगले-वाईट अनुभव येत असतात. पराभवापेक्षा त्यानंतर उमटणाऱ्या प्रतिक्रिया अधिक वेदनादायी असतात. अंतर्मुख होत पराभव झटकून आगेकूच करणे महत्त्वाचे ठरते. भारतीय संघ आता बंगळुरूकडे प्रयाण करणार आहे. भारतीय संघाच्या क्षमतेवर शंका घेण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. यजमान संघाची पुनरागमन करण्याच्या क्षमतेबाबत उत्सुकता आहे. खेळाडूंच्या जीवनात आत्मविश्वास हा महत्त्वाचा भाग आहे. ‘हे मी करू शकतो’ किंवा ‘हे मला करता येईल का?’ या दोन्ही विचार करण्याच्या पद्धतीमध्ये फरक आहे. यात कर्णधार आणि प्रशिक्षक महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. त्याचे एक कारण आहे. या मालिकेत विजयासाठी भारतीय संघाला पसंती देण्यात आली होती. पण पहिल्या कसोटी सामन्यात संघातील उणिवा चव्हाट्यावर आल्या. त्यामुळे खेळाडूंच्या आत्मविश्वासाला तडा जाण्याची शक्यता आहे. चांगले खेळाडू वाईट अनुभव विसरून भविष्यात चमकदार कामगिरी कशी करता येईल, यावर लक्ष केंद्रित करतात. पहिला सेट गमावला असला तरी अद्याप सामना जिंकण्याची संधी आहे, हे विसरता येणार नाही. प्रतिस्पर्धी तंबूतील खेळाडू मोहीम फत्ते केल्यानंतर एकमेकांकडे बघत होते आणि आपण खरंच हे साध्य करू शकतो? असा भाव त्यांच्या चेहऱ्यावर होता. विजयाचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट झळकत होता. स्टार्क, ओकिफी आणि स्मिथ हे आॅस्ट्रेलियाच्या विजयाचे शिल्पकार ठरले. त्यांना फलंदाजीमध्ये रेनशॉ, क्षेत्ररक्षणात हँड््सकोंब आणि गोलंदाजीमध्ये लियोनची साथ लाभली. वॉर्नर व हेजलवूड चांगले खेळाडू असून, त्यांना या मालिकेत मोठी भूमिका बजवायची आहे. मार्श बंधूही छाप सोडतील अशी आशा आहे. भारतीय संघासाठी सकारात्मक बाब म्हणजे उमेश यादवची गोलंदाजी ठरली. भारतीय वातावरणामध्ये रिव्हर्स स्विंग गोलंदाजीच्या बळावर त्याने प्रतिस्पर्धी फलंदाजांवर वर्चस्व गाजवले आहे. तो चांगला खेळाडू असून फॉर्मात आहे. तो कोहलीकडे अधिक गोलंदाजी करण्याची मागणी करू शकतो. शमी लवकर फिट व्हावा, हे भारतीय संघासाठी आवश्यक आहे. बंगळुरूमध्ये चार गोलंदाज खेळवायचे की पाच हा चर्चेचा मुद्दा ठरू शकतो. भारतीय संघाला पराभवावर मंथन करायला पुरेसा वेळ असून बंगळुरूमध्ये चुरशीची लढत अनुभवायला मिळेल, अशी आशा आहे. (पीएमजी)
आत्मविश्वास हा अधिक महत्त्वाचा भाग
By admin | Updated: February 26, 2017 23:55 IST