शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

किरण भगतकडून काका पंजाबी झोळी डावावर चितपट

By admin | Updated: August 30, 2016 23:29 IST

मल्ल किरण भगत याने अमृतसरच्या काका पंजाबीला झोळी डावावर चितपट करीत दोन लाख ५१ हजार रुपयांचे बक्षीस जिंकले.

ऑनलाइन लोकमतखानापूर, दि. 30 - श्री भवानीदेवीच्या यात्रेनिमित्त बलवडी (खा., ता. खानापूर) येथे आयोजित केलेल्या कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकासाठी झालेल्या अटीतटीच्या कुस्तीत पुण्याच्या आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलाचा मल्ल किरण भगत याने अमृतसरच्या काका पंजाबीला झोळी डावावर चितपट करीत दोन लाख ५१ हजार रुपयांचे बक्षीस जिंकले. या कुस्ती मैदानात विजयी मल्लांना सुमारे २0 लाख रुपयांची बक्षिसे देण्यात आली.प्रतिवर्षीप्रमाणे बलवडी (खा.) येथील भवानीदेवीची यात्रा श्रावण महिन्यातील शेवटच्या मंगळवारी पार पडली. यानिमित्त जंगी कुस्त्यांचे मैदान आयोजित केले होते. यावर्षी प्रथम क्रमांकाच्या कुस्तीसाठी श्रीराम कलेक्शनच्यावतीने दोन लाख एक्कावन्न हजारांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. किरण भगत (पुणे) विरुद्ध काका पंजाबी (अमृतसर) यांच्यातील कुस्ती सुरुवातीस सावध पवित्र्यात होती. दोघांनीही एकमेकांच्या ताकदीचा अंदाज घेत डाव-प्रतिडाव टाकण्याचा प्रयत्न केला. पंधरा ते वीस मिनिटानंतर किरण भगतने आक्रमक पवित्रा घेतला.काका पंजाबीने किरण भगतचे आक्रमण अर्धा तास थोपविले, परंतु अखेरीस किरण भगत याने झोळी डावावर पंजाबीस अस्मान दाखवित विजय संपादन केला. यावेळी कुस्तीशौकिनांनी मोठा जल्लोष केला. मैदानातील द्वितीय क्रमांकाची कुस्ती उपमहाराष्ट्र केसरी विकास जाधव (पुणे) विरुद्ध सोनू पैलवान (सेना दल) यांच्यात झाली. विकास जाधव याने अवघ्या दहाव्या मिनिटास सेना दलाच्या सोनू पैलवानला एकलंगी डावावर चितपट करीत कुस्तीशौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. या कुस्तीसाठी राहुल गायकवाड व ऋषिकेश गायकवाड यांनी दोन लाख रुपयांचे इनाम ठेवले होते. मैदानातील तृतीय क्रमांकाच्या कुस्तीत संतोष दोरवड (कोल्हापूर) याने मारुती जाधव (न्यू मोतीबाग) याला विसाव्या मिनिटात दुहेरी पट काढून अस्मान दाखविले. या कुस्तीकरिता जि. प. सदस्य सुहास (नाना) शिंदे यांनी दीड लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. प्रतिवर्षीप्रमाणे सिद्धेश्वर गायकवाड व गजानन जाधव यांनी बक्षीस ठेवलेल्या मानाच्या चांदीच्या गदेच्या कुस्तीत विजय गुटाळ (कोल्हापूर) याने सुधाकर गुंड (सांगली) याला पंधराव्या मिनिटास पाय घिस्सा डावावर चितपट केले व उपस्थितांची वाहवा मिळविली. तसेच आप्पा बुटे (बेणापूर) विरुद्ध अमोल फडतरे (कोल्हापूर) यांच्यात लावलेली एक लाख रुपयांची कुस्ती अर्ध्या तासानंतर बरोबरीत सोडविण्यात आली. माउली जमदाडे (गंगावेश-कोल्हापूर) विरुद्ध अमितकुमार दिल्लीवाले (गुरू हनुमान आखाडा) यांच्यातील पंचाहत्तर हजार रुपये बक्षिसाची कुस्तीही प्रदीर्घ वेळेनंतर बरोबरीत सोडविण्यात आली. अण्णा कोळेकर (गंगावेश, कोल्हापूर) याने अवघ्या दहाव्या मिनिटास राजेंद्र राजमाने (पुणे) याला एकचौक डावावर अस्मान दाखवित चटकदार विजय मिळविला. बेणापूरच्या जालिंदर म्हारगुडेने दिल्लीच्या अशोककुमारला विसाव्या मिनिटास घुटना डावावर चितपट केले, तर उमाजी शिरतोडे (खवसपूर) याने संग्राम पाटील (कोल्हापूर) याला पराभूत करीत प्रेक्षणीय विजय संपादन केला. या तिन्ही कुस्त्यांसाठी प्रत्येकी पंच्याहत्तर हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. संतोष सुतार (कुर्डूवाडी) विरुद्ध अमोल राक्षे (पुणे) यांच्यातील पंचाहत्तर हजार बक्षिसाची कुस्ती पाऊण तासानंतर सोडविण्यात आली. सुनील शेवतकर (कुर्डूवाडी) याने शैलेश शेळके (पुणे) याला पोकळ घिस्सा डावावर अस्मान दाखवित चाळीस हजारांचे बक्षीस जिंकले. स्थानिक मल्ल मयूर गायकवाड (बलवडी) याने सागर जाधव (कोल्हापूूर) याला कुस्ती सुरू होताच दोन-तीन मिनिटांत एकलांग डावावर चितपट केले व कुस्तीशौकिनांची शाबासकी मिळविली. अंकुश गायकवडी (बलवडी) याने सुद्धा अवघ्या चौथ्या मिनिटास उत्तम लबाडे (वारणानगर) याचा निकाल डावावर पराभव केला. या दोन्ही कुस्तीकरिता प्रत्येकी तीस हजार रुपयांचे इनाम ठेवले होते. अक्षय कदम (कोल्हापूर) विरुद्ध असिफ मुलाणी (सांगली) यांच्यातील तीस हजारांची कुस्ती चाळीस मिनिटांनंतर सोडविण्यात आली. तीस हजार रुपये इनामाच्या कुस्तीत शंकर मोहिते (बेणापूर) व सागर गोरड (बेणापूर) यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर प्रेक्षणीय विजय मिळविले. गजेंद्र पाटील (बेणापूर) याने वीस हजार रुपयांच्या कुस्तीत चटकदार विजय मिळविला. मैदानात सर्वांत प्रेक्षणीय ठरलेली व कुस्तीशौकिनांना श्वास रोखून ठेवण्यास भाग पाडलेली दत्ता नरळे (गंगावेश) व मुन्ना जुंजुरगे (पंजाब) यांच्यामधील कुस्ती अखेरीस सोडविण्यात आली. दहा हजार इनामाच्या कुस्तीत रामचंद्र वगरे, खाशाबा मदने, सागर थोरात, सुगंध देवकर (सर्व बेणापूर) यांनी प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळविले.मैदानाचे उद्घाटन दुपारी १ वाजता अशोक गायकवाड व मारुती गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. श्रीफळापासून दहा हजार रुपयांपर्यंतच्या जवळजवळ सर्व कुस्त्या निकाली झाल्या. पंच म्हणून मालोजी शिंदे (बेणापूर), गणेश मानगुडे, रावसाहेब मगर (निमगाव), यशवंत कदम (भूड), मोहन पाटील (हातनूर), उत्तम पाटील, किशोर अवघडे (सांगली), शिवाजी मदने (कारंदवाडी), शिवाजी हसबे, जगन्नाथ गायकवाड (बलवडी), राजेंद्र शिंदे (बेणापूर) यांनी काम पाहिले. मैदानास माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, जि. प. सभापती भाऊसाहेब पाटील, जि. प. सदस्य सुहास शिंदे, हिंदकेसरी संतोष वेताळ, महाराष्ट्र केसरी रावसाहेब मगर, (छोटा) मल्लसम्राट अस्लम काझी, गोविंद पवार (पुणे), पोलिस उपनिरीक्षक अमोल शिंदे यांनी भेट दिली. निवेदक म्हणून शंकर पुजारी (कोथळी), प्रा. रामचंद्र गुरव, वसंत देवकर यांनी काम पाहिले.