नवी दिल्ली : स्वीडिश ग्रांप्री स्पर्धेत भारताची नेमबाज अपूर्वी चंदेलाने महिला गटात दहा मीटर एअर रायफल प्रकारात २११.२ गुणांसह नव्या विश्वविक्रमाची नोंद करीत सुवर्णपदक पटकावले. तिने चीनच्या आॅलिम्पिक सुवर्णविजेत्या यी सिलिंगच्या २११ गुणांचा विक्रम मोडीत काढला. चंदेलाने या वर्षाची यशस्वी सुरुवात केली. तिने यापूर्वीच रियो आॅलिम्पिकचे तिकीट मिळविले आहे. स्वीडनच्या एस्ट्रीड स्टीफेन्सनने २०७.६ गुणांसह रौप्य, तर स्टीन नीलसनने १८५.० गुण मिळवित कांस्यपदक संपादन केले. चंदेलाने गत महिन्यात झालेल्या राष्ट्रीय अंजिक्यपद स्पर्धेतही सुवर्णपदक पटकावले होते. तसेच गतवर्षी एप्रिलमध्ये कोरियात झालेल्या आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेतही तिने कांस्यपदक संपादन करीत आॅलिम्पिक कोटा मिळविला होता. (वृत्तसंस्था)
चंदेलाचा रेकॉर्डब्रेक नेम
By admin | Updated: January 7, 2016 00:15 IST