मुंबई : भारतामध्ये कबड्डी क्रांती करणाऱ्या ‘प्रो कबड्डी लीग’ स्पर्धेच्या दुसऱ्या सत्राला शनिवारी मुंबईतील नॅशनल स्पोटर््स क्लब आॅफ इंडिया (एनएससीआय) येथे दिमाखात सुरुवात होईल. आठ संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत यजमान मुंबईच्या ‘यू मुंबा’ आणि गतविजेते ‘जयपूर पिंक पँथर्स’ या संघांमध्ये स्पर्धेचा सलामीचा सामना होईल. बॉलिवूडचा तडका आणि विविध स्पोटर््स सेलिब्रेटींचा असणारा सहभाग यामुळे कबड्डीला जबरदस्त ग्लॅमर मिळाले. क्रिकेटच्या आयपीएलनंतर लीग फॉर्मेटमधील सर्वात गाजलेली स्पर्धा म्हणून प्रो कबड्डीने आपली वेगळी ओळख निर्माण केली. पारंपारीकरीत्या मातीवर खेळल्या जाणाऱ्या कबड्डीने मॅटवर पदार्पण करत चांगलाच वेग पकडला. विशेष म्हणजे कबड्डीप्रेमींनी देखील कबड्डीच्या या आधुनिक रुपाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने ही स्पर्धा चांगलीच गाजली. बॉलिवूडच्या सहभागाने ग्लॅमरस झालेल्या या स्पर्धेचे पहिले सत्र १८ ते २१ जुलै दरम्यान मुंबईत पार पडेल. त्याचवेळी शानदार कार्यक्रमाद्वारे उद्घाटन होणाऱ्या प्रो कबड्डीच्या पहिल्याच दिवशी बॉलिवूड तडका बसणार असल्याने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. यामध्ये सर्वांचे लक्ष असेल ते शेहनशाह ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांच्याकडे. अमिताभ यांच्या आवाजातील प्रो कबड्डीचे थीम साँग ‘ले पंगा’ सध्या चांगलेच गाजत असताना स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी स्वत: अमिताभ राष्ट्रगीत गाणार असल्याने यंदाची सुरुवात धमाकेदार होणार हे नक्की.यंदाचे पहिले सत्र मुंबईत पार पडल्यानंतर कोलकाता (२१ ते २५ जुले), जयपूर (२६ ते २९ जुलै), पटणा (३० जुलै - २ आॅगस्ट), हैदराबाद (४ ते ७ आॅगस्ट), दिल्ली (८ - ११ आॅगस्ट), बंगळुरु (१२ - १५ आॅगस्ट) आणि पुणे (१६ ते १९ आॅगस्ट) या ठिकाणी इतर सामने रंगतील. त्याचप्रमाणे यानंतर २१ आॅगस्टला मुंबई येथे दोन उपांत्य सामने रंगणार असून २३ आॅगस्टला तिसऱ्या व चैथ्या क्रमांच्या सामन्यानंतर स्पर्धेचा अंतिम सामना होईल. यंदाच्या स्पर्धेत विजयी संघाला एक कोटी, तर उपविजेत्यास ५० लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. (क्रीडा प्रतिनिधी)पाकिस्तानी खेळाडू महाराष्ट्रात खेळणार नाही...पाकिस्तानी खेळाडूंच्या सहभागावरुन गुरुवारी मुंबईत शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेत कडवा विरोध दर्शवला. यावर प्रो कबड्डी आयोजकांनी गांभिर्याने विचार करुन अखेर मुंबई व पुणे येथील सामन्यात पाकिस्तानी खेळाडूंना न खेळविण्याचा निर्णय घेतल्याचे कळवले. मुंबई व पुणे येथे स्पर्धा कोणत्याही अडथळ्यांशिवाय व सुरक्षिततेमध्ये पार पडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे देखील आयोजकांनी सांगितले.
मुंबईसमोर गतविजेत्या जयपूरचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2015 00:30 IST