कराची : स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दोषी ठरलेले पाकचे खेळाडू सलमान बट, मोहंमद आमिर आणि मोहंमद आसिफ यांच्यावरील ५ वर्षांची बंदी संपुष्टात आली; पण संघात पुन्हा स्थान मिळवायचे झाल्यास या तिन्ही खेळाडूंंनी स्वच्छ चारित्र्याची प्रामाणिकता सिद्ध करावी, असे पीसीबीचे मुख्य निवडकर्ते हारून रशीद यांनी म्हटले आहे.हारून म्हणाले, ‘‘हे खेळाडू कसा खेळ करतात, हे महत्त्वाचे आहेच; पण त्याहूनची महत्त्वाचे हे, की तिघेही किती प्रामाणिक आणि जबाबदार झाले आहेत. तिघांसाठी लोकांच्या मनात स्थान निर्माण करणे कठीण आणि आव्हानात्मक असेल.’’आगामी झिम्बाब्वे दौरा व त्यानंतर इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी निवडकर्ते या तिघांच्या नावाचा मुळीच विचार करणार नाहीत. पीसीबीने तिघांना सुधारण्यास वाव दिला असल्याने तिघेही जानेवारीपर्यंत व्यस्त आहेत. त्यानंतर प्रथमश्रेणी सामने खेळण्याची संधी दिली जाईल. त्यानंतरच आम्ही राष्ट्रीय संघात त्यांना स्थान देण्याचा विचार करू शकतो.’’ २०१०मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यादरम्यान तिन्ही खेळाडू स्पॉट फिक्सिंगमध्ये अडकले होते. त्यांच्यावर घातलेल्या बंदीचा कालावधी बुधवारी संपताच तिघांनीही लाहोरमध्ये नेट प्रॅक्टिस करून आनंद लुटला. मोहंमद आसिफ आणि सलमान बट हे नॅशनल टी-२० चॅम्पियनशिपमध्ये लाहोरकडून खेळणार आहेत. (वृत्तसंस्था)
बट, आमिर, आसिफ यांना प्रामाणिकता सिद्ध करण्याचे फर्मान
By admin | Updated: September 3, 2015 22:36 IST