ब्लोमफाऊंटेन : ज्योस बटलरच्या शतकी (१०५ धावा, ७६ चेंडू, ११ चौकार, पाच षटकार) खेळीच्या बळावर पावसामुळे अडथळा आल्यानंतरही द. आफ्रिकेविरुद्ध पहिला वन डे इंग्लंडने डकवर्थ- लुईस पद्धतीनुसार ३९ धावांनी जिंकला. इंग्लंडने ९ बाद ३९९ धावा उभारल्या. द. आफ्रिकेविरुद्ध ही त्यांची सर्वोच्च खेळी ठरली. सर्वकालीन ही दुसरी मोठी धावसंख्या आहे. द. आफ्रिकेने देखील विजयी लक्ष्य गाठण्याचा यशस्वी प्रयत्न केला पण पावसाने त्यांच्या मनसुब्यांवर विरजण टाकले. यष्टिरक्षक- फलंदाज क्वींटन डिकॉक याने शानदार शतक झळकविले. त्याने ९६ चेंडूत नाबाद १३८ धावांचा झंझावात केला. पावसामुळे खेळ थांबला त्यावेळी आफ्रिकेने ३३.३ षटकांत पाच बाद २५० पर्यंत मजल गाठली होती. त्याला फाफ डुप्लेसिसची साथ लाभली. डुप्लेसिसने ५५ धावा ठोकल्या. इंग्लंडचा सलामीवीर जेसनराय याने ३० चेंडूत ४८, तसेच अॅलेक्स हेल्स, ज्यो रुट आणि बेन स्टोक्स यांनी देखील अर्धशतके झळकविली. इंग्लंडच्या डावात ५० व त्यापेक्षा मोठ्या पाच भागीदारी होत्या. द. आफ्रिकेच्या गोलंदाजांना चांगलाच चोप बसला. त्यांच्या माऱ्यावर तब्बल १५ षटकार लागले. चार गोलंदाजांनी ७० पेक्षा अधिक धावा दिल्या. फिरकी गोलंदाज बेहारडियन आणि ड्यूमिनी या दोघांनी ९३ धावा दिल्या. (वृत्तसंस्था)
बटलरची शतकी खेळी इंग्लंडचा द. आफ्रिकेवर विजय
By admin | Updated: February 5, 2016 03:31 IST