माँट्रीयल : ब्राझीलियन स्टार खेळाडू मार्टाने केलेल्या विक्रमी गोलाच्या जोरावर बलाढ्य ब्राझीलने २००७ सालच्या उपविजेत्या दक्षिण कोरियाला महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या ‘ई’ गटाच्या साखळी सामन्यात २-० असे नमवले. मार्टाने यावेळी स्पर्धा इतिहासात विक्रमी १५ व्या गोलची नोंद करताना जर्मनीच्या बर्जिट प्रिंजला पिछाडीवर टाकले.एकतर्फी झालेल्या या सामन्यात ब्राझीलने आपल्या लौकिकानुसार आक्रमक खेळ करताना दक्षिण कोरियाला प्रतिकाराची संधीच दिली नाही. पहिल्या सत्रापासूनच ब्राझीलने चेंडुवर अधिक वर्चस्व राखण्यात यश मिळवले होते. विशेष म्हणजे ब्राझीलची बुजुर्ग ३७ वर्षीय फोरमिगा हिने अप्रतिम खेळाचे प्रदर्शन करताना शानदार गोल केला. यामुळे मध्यंतराला ब्राझीलने १-० अशी आघाडी घेत सामन्यावर वर्चस्व राखले.मध्यंतरानंतर पुन्हा एकदा ब्राझीलने आक्रमक चाली रचताना कोरियाला दबावाखाली आणले. त्यातच ५३व्या मिनीटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचा पुरेपुर फायदा उचलताना मार्टाने निर्णायक गोल केला आणि ब्राझीलच्या २-० अशा सफाईदार विजयावर शिक्कामोर्तब केले. दरम्यान महिला विश्वचषक स्पर्धेत गोल करणारी सर्वात वयस्क खेळाडूचा मान फोरमिगाने मिळवला. त्यामुळे यावेळी एकाच सामन्यात ब्राझीलच्या अव्वल खेळाडूंनी जागतिक विक्रम नोंदवला. दरम्यान या एकतर्फी विजयासह ब्राझीलने गटात अव्वल स्थान पटकावले असून त्यांचा पुढील सामना स्पेन विरुध्द होईल. दुसऱ्या बाजूला ‘फ’ गटात फ्रान्सने शानदार विजयी सलामी देताना कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या इंग्लंडला १-० अशी धूळ चारली. (वृत्तसंस्था)
ब्राझीलने दक्षिण कोरियाला नमवले
By admin | Updated: June 11, 2015 08:49 IST