इंचियोन : आॅलिम्पिकमध्ये भारताला पहिले वैयक्तिक सुवर्णपदक मिळवून देणारा नेमबाज अभिनव बिंद्रा याने आशियाई स्पर्धेतील सामन्यानंतर निवृत्ती घेण्याचे जाहीर केले. आपण व्यावसायिक नेमबाजीतून उद्या, मंगळवारी निवृत्ती घेणार असल्याचे बिंद्राने टिष्ट्वट केले. बिंद्रा १० मीटर एअर रायफल प्रकारात अखेरचा सुवर्णवेध घेण्यासाठी सज्ज झाला आहे. उद्या व्यावसायिक नेमबाजीतील माझा शेवटचा दिवस असेल; परंतु एक हौशी नेमबाज म्हणून मी आठवड्यातून दोन वेळा सराव करेन, असे बिंद्राने टिष्ट्वट केले. मात्र, २०१६ मध्ये ब्राझील येथे होणाऱ्या रिओ आॅलिम्पिकमध्ये सहभाग घेणार असल्याचे त्याने स्पष्ट केले. २००८च्या बीजिंग आॅलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा बिंद्रा म्हणाला, रिओसाठी मी तयारी सुरूच ठेवणार आहे. माझ्या पदकांची पेटी भरलेली आहे आणि आशा करतो की त्यात आणखी भर पडत राहील. बिंद्राने याच वर्षी पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते आणि त्यानंतर त्याने राष्ट्रकुल स्पर्धेतून निवृत्तीची घोषणा केली होती. चार वर्षांपूर्वी ग्लासगो आशियाई स्पर्धेत त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते; परंतु तो उद्या सुवर्णपदकासाठी प्रयत्नशील असेल.
बिंद्राची निवृत्ती
By admin | Updated: September 23, 2014 05:53 IST