मीरपूर : बांगलादेशचा कर्णधार मशरफे मूर्तजा याने भारताविरुद्ध एकदिवसीय मालिकेतील विजय हा त्यांच्या संघाची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी होती आणि त्यांच्या संघाकडे जगातील कोणत्याही संघाविरुद्ध चांगले कौशल्य दाखविण्याची क्षमता असल्याचे सांगितले.बांगलादेशाने प्रथमच आपला शेजारी देश भारताविरुद्ध द्विपक्षीय मालिका २-१ ने जिंकली. ते त्यांचा मालिकेतील अखेरचा सामना ७७ धावांनी पराभूत झाले.मूर्तजा म्हणाला की, ‘आम्ही आयसीसी रँकिंगमध्ये अव्वल चौथ्या स्थानापर्यंत असलेल्या कोणत्याही संघाविरुद्ध याआधी मालिका जिंकू शकलो नव्हतो. भारातविरुद्ध जिंकणे हे सर्वोत्तम असल्याचे आपल्याला वाटते.’ बांगलादेशकडून काल झालेल्या पराभवाआधी सलग दहा सामने जिंकले होते. त्यांनी झिम्बाब्वे आणि पाकिस्तानचा सफाया केला होता. बांगलादेशला परदेशात सामने जिंकावे लागतील व विशेषत: मोठ्या संघाविरुद्ध, असे इंग्लंडचा महान खेळाडू जेफ्री बायकॉटने म्हटले होते. यावर मूर्तजा म्हणाला की, ‘परदेशात सर्वांनाच संघर्ष करावा लागतो. आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील परिस्थिती आमच्यासाठी सोपी नसते; परंतु आम्ही वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी केली. आमच्याजवळ विश्वास आहे. हा संघ कोठेही आपली सर्वोत्तम कामगिरी करू शकतो आणि कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होऊ शकतो.’ (वृत्तसंस्था)
भारताविरुद्ध मिळालेला हा सर्वोत्तम विजय : मूर्तजा
By admin | Updated: June 26, 2015 01:19 IST