आॅकलंड : विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्व गुणावर स्तुतिसुमनांची उधळण होत आहे; परंतु गोलंदाजांच्या चांगल्या कामगिरीमुळे आपण सर्वोत्तम कर्णधार दिसत आहोत, असे यष्टीरक्षक फलंदाज धोनीने स्पष्ट केले आहे.आयर्लंडविरुद्ध गत सामन्यात ३0 षटकांपर्यंतची जबाबदारी फिरकी गोलंदाजांनी सांभाळली होती. आयर्लंडविरुद्धच्या सामन्यानंतर पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत संघात गोलंदाजांच्या पर्यायाची योग्यपणे हाताळणी केल्यामुळे कर्णधार म्हणून सर्वोत्तम कामगिरी होतेय का, असा प्रश्न धोनीला विचारण्यात आला. त्यावर धोनीने स्मित हास्य केले आणि तो म्हणाला, नाही. जेव्हा गोलंदाज चांगली कामगिरी करतात, तेव्हाच मी सर्वोत्तम कर्णधार दिसतो, असे उत्तर त्याने दिले.धोनी म्हणाला, की प्रतिस्पर्धी संघावर दबाव वाढवण्यासाठी गोलंदाजांना एकाच लाइनवर गोलंदाजी करा, असे तुम्हाला सातत्याने त्यांना बजवावे लागते. आता त्यांनी पाहिले, अनुभवले आणि त्याविषयीची समज त्यांच्यात आली आहे, तसेच त्याचे महत्त्वही त्यांना पटले आहे. त्यामुळे जेव्हा ते पुन्हा कसोटी मालिकेसाठी उपखंडाबाहेर जातील तेव्हा त्यांना उपमहाखंडात जास्तीत जास्त वेळ आपली लाइन आणि लेंथवर लक्ष केंद्रित करावे लागेल, याचे स्मरण राहील आणि त्याचा फायदाही होईल. त्यामुळे निश्चितपणे आमच्यासाठी काही चांगले बदल होतील आणि आमच्याशी जितक्या समस्या जुळलेल्या आहेत, त्यावर तोडगा निघेल. आमच्या गोलंदाजांनी काही शिकले आहे आणि ही शिकवण ते पुढेही कायम ठेवतील, अशी आशा वाटते असेही धोनी म्हणाला. (वृत्तसंस्था)
गोलंदाजांच्या कामगिरीमुळे वाटतोय सर्वोत्तम कर्णधार
By admin | Updated: March 12, 2015 00:37 IST