नवी दिल्ली : भारतीय कसोटी कर्णधार विराट कोहलीची १०व्या वार्षिक इएसपीएन क्रिकइन्फो पुरस्कारामध्ये वर्षातील सर्वोत्तम कर्णधार म्हणून निवड झाली. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय कसोटी संघाने १२ पैकी ९ सामन्यांत विजय मिळविला. माजी महान क्रिकेटपटू, इएसपीएन-क्रिकइन्फोचे सीनिअर संपादक, लेखक आणि जागतिक वार्ताहरांच्या स्वतंत्र समितीने विजेत्यांची निवड केली. त्यात इयान चॅपेल, माहेला जयवर्धने, रमीज राजा, ईसा गुहा, सम्बित बाल, कर्टनी वॉल्श, मार्क बुचर आणि सायन टफेल यांचा समावेश होता. इंग्लंडच्या बेन स्टोक्सने केपटाऊनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १९८ चेंडूंमध्ये २५८ धावांची खेळी केली होती. त्यासाठी फलंदाजीमध्ये वर्षातील सर्वोत्तम कामगिरीच्या पुरस्कारासाठी त्याची निवड करण्यात आली. स्टोक्सचा सहकारी स्टुअर्ट ब्रॉडने तिसऱ्या कसोटीमध्ये १७ धावांच्या मोबदल्यात ६ बळी घेत इंग्लंडचा मालिका विजय निश्चित केला होता. त्यासाठी सलग दुसऱ्या वर्षी ‘वर्षातील सर्वोत्तम कसोटी गोलंदाज’ या पुरस्कारासाठी त्याची निवड करण्यात आली. सेंच्युरियनमध्ये आॅस्ट्रेलियाविरुद्ध क्विंटन डी कॉकने १७८ धावांची खेळी केली. दक्षिण आफ्रिकेतर्फे ही दुसरी सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली होती. या खेळीसाठी त्याची वर्षातील सर्वोत्तम वन-डे फलंदाज म्हणून निवड करण्यात आली. विंडीजचा फिरकीपटू सुनील नरेनची वर्षातील सर्वोत्तम वन-डे गोलंदाज म्हणून निवड करण्यात आली. गुयानामध्ये तिरंगी मालिकेत त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २७ धावांच्या मोबदल्यात ६ बळी घेतले होते. कार्लोस ब्रेथवेटची वर्षातील सर्वोत्तम टी-२० फलंदाज म्हणून निवड करण्यात आली. कोलकातामध्ये विश्व टी-२० फायनलमध्ये त्याने इंग्लंडविरुद्ध नाबाद ३४ धावांची खेळी केली होती. त्यात त्याने अखेरच्या षटकात सलग चार षटकार ठोकत विंडीजला विजय मिळवून दिला होता. बांगलादेशचा डावखुरा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान टी-२० मध्ये वर्षातील सर्वोत्तम गोलंदाज ठरला. त्याने कोलकातामध्ये न्यूझीलंडविरुद्ध विश्व टी-२० स्पर्धेदरम्यान २२ धावांच्या मोबदल्यात पाच बळी घेतले होते. बांगलादेशच्या राष्ट्रीय संघातर्फे प्रतिनिधित्व करणारा मेहंदी हसन मिराजने इंग्लंडविरुद्ध दोन कसोटी सामन्यात १९ बळी घेतले होते. त्यासाठी त्याची वर्षातील पदार्पण करणारा सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड करण्यात आली. (वृत्तसंस्था)>यंदापासून इएसपीएन-क्रिकइन्फोने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये महिला खेळाडूंनाही पुरस्कृत करण्याचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजची हेयले विलियम्सने आॅस्ट्रेलियाविरुद्ध विश्व टी-२०च्या फायनलमध्ये ४५ चेंडूंमध्ये ६६ धावांची खेळी केली होती. फलंदाजीमध्ये वर्षातील सर्वोत्तम कामगिरीसाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी तिची निवड झाली. न्यूझीलंडची प्रतिभावान आॅफ स्पिनर लेघ कास्पेरेक वर्षातील सर्वोत्तम गोलंदाज पुरस्काराची मानकरी ठरली. विश्व टी-२० स्पर्धेत आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत तीन बळी घेतले होते. >इतर पुरस्कारसर्वोत्तम कसोटी फलंदाज : स्टोक्ससर्वोत्तम कसोटी गोलंदाज : ब्रॉड सर्वोत्तम वन-डे फलंदाज : डी कॉक सर्वोत्तम वन-डे गोलंदाज : नरेन सर्वोत्तम टी-२० फलंदाज : ब्रेथवेट सर्वोत्तम टी-२० गोलंदाज : मुस्तफिजुर
विराट वर्षातील सर्वोत्तम कर्णधार
By admin | Updated: February 28, 2017 03:54 IST