दुबई : जगातील सर्वांत श्रीमंत क्रि केट संघटना अशी बिरुदावली मिरवणाऱ्या भारतीय क्रि केट बोर्डाची (बीसीसीआय) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील मक्तेदारी संपुष्टात आली आहे. भारताला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) नफ्यातून प्रतिवर्षी ५७ कोटी डॉलर रक्कम मिळते. मात्र, आता ही रक्कम निम्म्यावर येणार आहे. दुबई येथे आयसीसीच्या मुख्यालयात आज संमत झालेल्या ठरावानुसार, बीसीसीआयला फक्त २९ कोटी ३० लाख डॉलर मिळतील. यामुळे भारताला ही मोठी चपराक मानली जाते. विशेष म्हणजे, भारताचे शशांक मनोहर हेच आयसीसीचे अध्यक्ष असून त्यांच्याच नेतृत्वाखाली आयसीसीच्या आर्थिक सुधारणा करण्यात आल्या आहेत. या नव्या आर्थिक धोरणानुसार इंग्लंडच्या मंडळाला १४ कोटी ३० लाख डॉलर मिळतील. आयसीसीच्या सध्याच्या आर्थिक संरचनेनुसार भारत, आॅस्ट्रेलिया व इंग्लंड यांचे वर्चस्व आहे. या निर्णयामुळे भारताची मक्तेदारी आपोआप संपुष्टात येईल. दुबई येथे आयसीसी संलग्नित सर्व देशांची बैठक सुरू आहे. या बैठकीत आर्थिक सुधारणांच्या मुद्द्यावर बुधवारी झालेल्या निवडणुकीत बीसीसीआयने सुधारणाविरोधी मतदान केले. मात्र, इतर सदस्यांनी सुधारणेच्या बाजूने कौल दिल्याने बीसीसीआयच्या मक्तेदारीला वेसण बसली. प्रशासकीय संरचना व घटनात्मक बदल यांसाठी झालेल्या मतदानात भारताला श्रीलंकेने साथ दिली. मात्र, अन्य सदस्यांनी सुधारणेच्या बाजूने मतदान केल्याने याही मुद्द्यांवर बीसीसीआयचा धुव्वा उडाला. दरम्यान, बैठकीत एकतर्फी पराभव झाल्याने दबावतंत्र म्हणून भारतीय संघ इंग्लंडमध्ये १ जूनपासून होणाऱ्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतून माघार घेण्याची शक्यता आहे. या संदर्भात सर्व पर्याय खुले असल्याचे बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. सिंगापूरसारख्या क्रि केटच्या पटलावरील नवख्या देशाला नफ्यात अधिक वाटा देण्याचे प्रयोजनच काय? यामागे कुणाची भूमिका आहे? बीसीसीआयचा कारभार चालविण्यासाठी दर वर्षी १६० कोटी डॉलर रक्कम खर्च होते. हा खर्च कसा कमी होणार? असा सवाल बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. (वृत्तसंस्था)
बीसीसीआयची आयसीसीतील मक्तेदारी संपुष्टात
By admin | Published: April 28, 2017 2:11 AM