नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दक्षिण आफ्रिकेत खेळल्या जात असलेल्या चार देशांच्या मालिकेत विक्रमी कामगिरी करणाऱ्या भारतीय महिला संघाचे अभिनंदन केले. दीप्ती शर्मा व पूनम राऊत यांनी आयर्लंडविरुद्धच्या लढतीत विक्रमी भागीदारी नोंदवली. बोर्डाचे प्रभारी सचिव अमिताभ चौधरी म्हणाले,‘भारतीय महिला संघाने विक्रमी कामगिरी केली आहे. त्यासाठी त्यांचे अभिनंदन करतो.’चौधरी पुढे म्हणाले,‘याची सुरुवात झुलन गोस्वामीने वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज म्हणून नोंदवलेल्या विक्रमाने झाली. दीप्ती व पूनम ३०० धावांची भागीदारी करणारी पहिली महिला जोडी ठरली.’ या दोघींनी आयर्लंडविरुद्धच्या लढतीत ४५.३ षटकांत ३२० धावांची भागीदारी केली. दीप्तीने १६० चेंडूंना सामोरे जाताना १८८ धावा केल्या.महिला क्रिकेटमध्ये ही दुसरी सर्वोच्च वैयक्तिक खेळी ठरली तर वन-डेमध्ये भारतीय महिला खेळाडूंमध्ये ही सर्वोच्च खेळी आहे. (वृत्तसंस्था)
बीसीसीआयने केले महिला संघाचे अभिनंदन
By admin | Updated: May 17, 2017 04:12 IST