नवी दिल्ली : हितसंबंध गुंतलेले असल्याच्या मुद्द्यावरून बोर्डाचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांना कामकाजापासून दूर ठेवण्याचा निर्णय बीसीसीआयने स्वत: घ्यावा. कोर्ट या प्रकरणी हस्तक्षेप करणार नाही, अशा शब्दांत सुप्रीम कोर्टाने सोमवारी बीसीसीआयची कानउघाडणी केली.न्या. तीरथसिंग ठाकूर आणि न्या. फकीर मोहंमस इब्राहिम कलीफुल्ला यांच्या खंडीपीठाने बीसीसीआयची बाजू ऐकल्यानंतर ‘श्रीनिवासन यांच्या हितसंबंधांबाबतचा निर्णय स्वत: घ्या; न्यायालय या प्रकरणी सतत लक्ष घालू शकणार नाही,’ असे स्पष्टपणे बजावले.सुनावणीदरम्यान बीसीसीआयच्या वकिलांना समज देऊन कोर्टाने सांगितले, ‘बोर्डाने श्रीनिवासन यांच्याविरुद्ध निर्णय घेतला आहे; मग त्यावर ठाम राहा. श्रीनिवासन यांना यावर काही आक्षेप असल्यास ते दाद मागण्यासाठी आमच्याकडे येऊ शकतात. न्यायालयाचा या संदर्भात वेगळा निर्णय येईपर्यंत आपण आपल्या निर्णयावर कायम राहावे.’आयपीएलमधील चेन्नई सुपरकिंग्सचे मालकी हक्क असल्यामुळे २२ जानेवारी रोजी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार श्रीनिवासन हे बोर्डाच्या बैठकीत सहभागी होण्यास पात्र आहेत काय, असा सल्ला बीसीसीआयने कोर्टाला मागितला होता. यावर न्यायालयाने स्पष्ट केले की, २२ जानेवारीच्या निर्णयावर स्पष्टीकरण देण्याचे कारण दिसत नाही. सीएसके आणि इंडिया सिमेंट लिमिटेड यांच्या शेअरधारकांचे पुनर्निधारण केल्यामुळे श्रीनिवासन हे हितसंबंधांच्या आरोपातून मोकळे होऊ शकत नाहीत, हा तर्कदेखील न्यायालयाने फेटाळला. बीसीसीआयकडून ज्येष्ठ विधिज्ञ के. के. वेणुगोपाल यांनी २२ फेब्रुवारी रोजी श्रीनिवासन यांनी इंडिया सिमेंट लिमिटेडच्या शेअरधारकांचे पुनर्गठन केले. शिवाय, नव्याने स्थापन झालेल्या सीएसकेचे शेअर हस्तांतरित करणे हा गौण मुद्दा आहे. वेणुगोपाल यांच्या युक्तिवादाला ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी विरोध दर्शविला होता. (वृत्तसंस्था) सचिव अनुराग ठाकूरविरुद्धचा खटला मागेअनुराग ठाकूर यांच्याविरुद्ध खोटे शपथपत्र दाखल केल्याप्रकरणी दाखल केलेला खटला बोर्डाचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी सोमवारी मागे घेतला. न्या. तीरथसिंग ठाकूर आणि न्या. फकीर मोहम्मद इब्राहिम कलीफुल्ला यांच्या खंडपीठापुढे ही याचिका होती. बीसीसीआयचे नवनिर्वाचित अध्यक्ष शशांक मनोहर यांनी रविवारी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर आमसभेत ठाकूरविरुद्धचा खटला मागे घेण्याचे आवाहन केल्यानंतर श्रीनिवासन यांनी त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत याचिका मागे घेतली.
निर्णय घेण्यास बीसीसीआय सक्षम
By admin | Updated: October 6, 2015 01:29 IST