नवी दिल्ली : ‘‘कोच डंकन फ्लेचर हे अद्यापही आपल्यासाठी बॉस आहेत आणि २०१५ च्या विश्वचषकापर्यंत पदकावर कायम राहतील.’’ टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचे हे वक्तव्य बसीसीआयच्या पचनी पडलेले नाही.कर्णधाराच्या या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करीत बोर्डाने हा मुद्दा कार्यकारिणीत चर्चेला आणण्याचा आग्रह धरला आहे.धोनीने ब्रिस्टल वन-डेच्या पूर्व संध्येला पत्रकारांशी बोलताना हे वक्तव्य केले होते. त्यावर बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. कर्णधाराने स्वत:ची मर्यादा ओलांडली असे पदाधिकाऱ्यांचे मत आहे. कोचच्या कार्यकाळाचा निर्णय धोनीला करायचा नाही, असे त्यांचे म्हणणे पडले. धोनीच्या वक्तव्यामुळे एक बाब स्पष्ट झाली ती ही की कसोटी मालिकेत इंग्लंडकडून १-३ ने सपाटून मार खल्यानंतर रवी शास्त्री याला संघाचे संचालक नियुक्त करण्याआधी बसीसीआय आणि धोनी यांच्यात एकमत झाले नसावे. हा मुद्दा बोर्डाच्या पुढील कार्यकारिणीत चर्चेला आणण्याचे सुतोवाच एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने केले. हा अधिकारी पुढे म्हणाला,‘ जे काही घडले ते निराशाजनक म्हणावे लागेल. कर्णधाराने असे बोलायला नको होते. बोर्डाच्या कार्यकारिणीत हा विषय चर्चेला येईल. खरे सांगायचे तर धोनीला यावर भाष्य करण्याचे अधिकार नाहीतच. संघाचा बॉस कोण हे धोनीच्या अधिकारकक्षेत येत नाही. कर्णधार म्हणून धोनीने स्वत:च्या मर्यादा ओलांडल्या. पत्रकार काहीही विचारु शकतात पण परिपक्व या नात्याने काय बोलावे हे त्याला कळायला हवे.’संघात ११ खेळाडू कोण हे बीसीसीआय अधिकारी ठरवित नाहीत मग धोनीने कुणाला कुठवर पदावर कायम ठेवावे हे ठरवू नये.’ विविध दौऱ्यांवर संघासोबत व्यवस्थापक म्हणून जाणारा हा अधिकारी पुढे म्हणाला,‘ सहकारी स्टाफची भर्ती आणि त्यांचा कार्यकाळ ठरविण्याचा अधिकार कर्णधाराला नाही.’बीसीसीआय सचिव संजय पटेल यांनी आधीच स्पष्ट केले की संघ आता रवी शास्त्री हे सांभाळतील तसेच फ्लेचर यांना शास्त्री यांच्या आधीन काम करावे लागेल. रवी शास्त्री यांनी देखील पत्रपरिषदेत संघाची सर्वोपरी जबाबदारी माझ्यावर असून फ्लेचर मला रिपोर्ट करतील असे सांगितले होते. धोनीने मात्र फ्लेचर यांना ‘बॉस’ संबोधून त्यांना २०१५ पर्यंत पदावर राहायचे आहे असेही सांगून टाकले. तो म्हणाला,‘ फ्लेचर हे अद्यापही बॉस आहेत आणि ते २०१५ च्या विश्वचषकापर्यंत आमचे कोच आहेत. त्यांचे अधिकार कमी झालेत का हे मला माहिती नाहीत पण संघात आधीसारखेच काम सुरू आहे. ड्रेसिंग रुममध्ये नवीन स्टाफ आला असला तरी एकूणच संचालन आधीसारखेच चालत आहे.’ (वृत्तसंस्था)
धोनीच्या वक्तव्यावर बीसीसीआय नाराज
By admin | Updated: August 26, 2014 02:59 IST