मेलबोर्न : भारतात १३ वर्षांत प्रथमच कसोटी सामना जिंकण्याचा पराक्रम करणाऱ्या आॅस्ट्रेलियन संघावर आॅस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांनी स्तुतिसुमने उधळली. स्टीव्ह स्मिथ एका दशकापेक्षा अधिक कालावधीनंतर आॅस्ट्रेलियन संघाला मालिका विजय मिळवून देण्यात सक्षम असल्याचे आॅस्ट्रेलियन मीडियाने म्हटले आहे. डावखुरा फिरकीपटू स्टीव्ह ओकिफीच्या चमकदार कामगिरीची प्रशंसा करण्यात आली. ओकिफीच्या कामगिरीच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने तीन दिवसांमध्ये ३३३ धावांनी शानदार विजय नोंदवला. ‘द आॅस्ट्रेलियन’ वृत्तपत्राने लिहिले की, ‘इतिहास रचला’, आॅस्ट्रेलियाने जवळजवळ १३ वर्षांनंतर भारतात पहिला कसोटी विजय साकारला. स्टीव्ह ओकिफीने सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक म्हणून आपली दखल घेण्यास भाग पाडले. भारत स्तब्ध झाला. एक अब्ज भारतीयांना अशा निकालाची अपेक्षा नव्हती. दोन कोटी आॅस्ट्रेलियन मात्र असा विचार करीत होते. आॅस्ट्रेलियन लोकांव्यतिरिक्त दुसऱ्या कुणाला स्टीव्ह स्मिथच्या संघाकडून अशी अपेक्षा नव्हती. सर्वोत्तम कामगिरी. फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर भारतावर वर्चस्व गाजवले ’आॅस्ट्रेलियाने २००४ नंतर भारतात हा पहिला कसोटी विजय नोंदवला. त्याचसोबत त्यांनी यजमान संघाची सलग १९ सामन्यांत अपराजित राहण्याची मालिका खंडित केली. ‘सन हेराल्ड’मध्ये सामन्यात १२ बळी घेणारा ओकीफी व शतक झळकावणारा कर्णधार स्मिथ यांची प्रशंसा केली आहे. या वृत्तपत्रात म्हटले आहे की, ‘स्टीव्ह ओकिफीने विक्रमी कामगिरी करताना भारतात आॅस्ट्रेलिया संघाला सर्वोत्तम विजय मिळवून दिला. यजमान संघाला तीन दिवसांत पराभव स्वीकारण्यास भाग पाडले. (वृत्तसंस्था)
आॅस्ट्रेलियन मीडियाने केली स्मिथची प्रशंसा
By admin | Updated: February 26, 2017 23:49 IST