ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २७ - बीसीसीआयचे नवनिर्वाचित सचिव अनुराग ठाकूर एका बुकीसोबत दिसल्याने आयसीसीने बीसीसीआयला झापले आहे. आयसीसीने ईमेल पाठवून बीसीसीआयचे या प्रकरणाकडे लक्ष वेधत त्यांची कानउघडणीही केली असली तरी या वादामागे श्रीनिवासन व अनुराग ठाकूर यांच्यातील शीतयुद्ध कारणीभूत असल्याची चर्चा रंगली आहे.
मार्चमध्ये बीसीसीआयच्या सचिवपदी निवड होताच अनुराग ठाकूर यांनी चंदिगडमध्ये एक पार्टी ठेवली होती. या पार्टीत केक कापत असताना अनुराग ठाकूर यांच्या शेजारी करण मल्होत्रा हा संशयित बुकी दिसत होता. अनुराग ठाकूर व करण मल्होत्राचे छायाचित्र आयसीसीला मिळाले असून आयसीसीने ईमेल पाठवत बीसीसीआयकडे आपली नाराजी दर्शवली आहे.
करण मल्होत्राचा आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी समितीच्या काळ्या यादीत समावेश आहे. मल्होत्राने आयपीएलमध्ये खेळाडूंशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला होता. बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी समितीचे तत्कालीन प्रमुख रवि सवानी यांनीदेखील सर्व संघ मालकांना पत्र पाठवून मल्होत्राशी चार हात लांब राहण्याचे निर्देश दिले होते असे आयसीसीच्या ईमेलमध्ये म्हटले आहे. बीसीसीआयने या ईमेलवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
एन. श्रीनिवासन आयसीसीचे चेअरमन असून अनुराग ठाकूर गटाला टक्कर देण्यासाठी श्रीनिवासन गटाने ही नवी खेळी खेळल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली आहे.