आजच्या अत्यंत प्रगत अशा टेक्नॉलॉजीच्या काळात बुद्धिबळ खेळाची व्याख्या काहीशी बदलत चालल्याचा भास बऱ्याचदा होत असतो. मात्र, तंत्रज्ञान प्रगत झाले नव्हते तेव्हा खेळाडूंना खेळाचा दर्जा वाढवण्यासाठी मुख्यत्वेकरून कल्पनाशक्तीवर जास्त भर द्यावा लागत असे. तेव्हा या खेळाचे स्वरूप वेगळेच होते. प्रत्येक खेळाडूचे मूल्यमापन हे त्याच्या कल्पनाशक्तीवर केले जात असे. विशेष करून, जुने आणि दिग्गज खेळाडू पॉल मॉर्फी, मिखाईल ताल यांची लोकप्रियता आजही कायम असण्याचे कारण म्हणजे, त्यांनी अशक्य वाटणारे मिळवलेले विजय व त्यातली कल्पकता!हे आठवण्याचे कारण म्हणजे, आज मुलींच्या गटात वूमन इंटरनॅशनल मास्टर अॅना इवानोव आणि वूमन फिडे मास्टर मिला झोर्कोविच यांच्यात खेळला गेलेला डाव. हा डाव केवळ आजचाच सर्वोत्तम न ठरता या स्पर्धेत आतापर्यंत झालेल्या डावांपैकी सर्वोत्तम ठरणारा आहे. इवानोवने राजाच्या समोरच्या प्याद्याने सुरुवात केली आणि त्याला झार्कोविचने सिसिलियन बचावातल्या पॉल्सेन प्रकाराने उत्तर दिले. ८व्या चालीत इवानोवने पटाच्या मध्यभागी असलेल्या घोड्याचा बळी दिला. वर-वर पाहता घोडा मारण्यात झार्कोविचसाठी कुठलाही धोका दिसत नव्हता. पण घोडा खाल्ल्यानंतर केवळ २-३ चाली होत नाही, तोच समोर काय वाढून ठेवले आहे, याची कल्पना तिला आली असावी. इथून पुढचा डाव म्हणजे इवानोवच्या प्रगल्भतेची कमाल होती. झार्कोविचचा राजा पटाच्या मध्ये अडकवून तिच्या कुठल्याही मोहऱ्याला बाहेर पडायची संधीच इवानोवने दिली नाही. ‘आपुले मरण पाहिले म्या डोळा’ अशी झार्कोविचची अवस्था झाली होती. २२व्या चालीत इवानोवने हत्तीचा बळी देऊ केला, परंतु झार्कोविचने हे बलिदान न स्वीकारता झुंज देण्याचा प्रयत्न चालू ठेवला होता. अखेर २८व्या चालीत तिने पराभव मान्य केला कारण ‘चेकमेट’ची नामुष्की ओढवली होती! संपूर्ण डावात एकटी इवानोवच खेळत होती, असे वाटत होते. आजचा विजय तिचे मनोबल वाढवणारा आणि प्रतिस्पर्ध्यांना तिची दखल घ्यायला लावणारा आहे.(लेखक ‘फिडे’चे मान्यताप्राप्त प्रशिक्षक आहेत)
अॅना इवानोव Vs मिला झार्कोविच
By admin | Updated: October 11, 2014 04:34 IST