पुणे : आगामी कसोटी मालिकेत भारताने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेला ४-० अशी मात दिल्यास भारतीय क्रिकेट संघ जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावरून दुसऱ्या स्थानी झेप घेऊ शकतो. येत्या ५ नोव्हेंबरला मोहालीत पहिल्या कसोटी सामन्यास सुरुवात होणार आहे. भारताने आफ्रिकेवर निर्विवाद वर्चस्व ठेवल्यास भारत या अव्वल स्थानावरील संघापेक्षा केवळ एका गुणाने मागे असेल. भारताने चारही सामने जिंकल्यास त्यांचे १३० गुण होतील. जर त्या उलट झाल्यास भारताचे ९६ गुण होतील. दुसरीकडे जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेली आॅस्ट्रेलियाची येत्या ६ नोव्हेंबर पासून न्यूझिलंड संघाशी लढत होणार आहे. या दोन्ही संघात तीन सामने खेळले जातील. तिसऱ्या स्थानी असलेला इंग्लंड व चौथ्या स्थानावरील पाकिस्तान संघात २६ गुणांची तफावत आहे. शारजात होणाऱ्या या तिसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानने इंग्लंडला नमविल्यास ते तब्बल एक दशकानंतर दुसरे स्थान पटकावतील. तर इंग्लंड हरल्यास ते न्यूझिलंड संघाच्या मागे ६ अंकांनी घसरतील. इंग्लंड जिंकल्यास या दोन्ही संघांचे जागतिक क्रमवारीतील स्थान कायम राहील. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) आॅस्ट्रेलिया-न्यूझिलंड मालिकेनंतर जागतिक कसोटी क्रमवारी जाहीर करणार आहे. (वृत्तसंस्था)दक्षिण आफ्रिका-भारत बलाबल दक्षिण आफ्रिकेचा तडाखेबंद फलंदाज एबी डिविलियर्स जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असून, हाशीम आमला चौथ्या, तर फाफ ड्यु प्लेसिस १६ व्या स्थानी आहे. भारताचा विराट कोहली १३ व्या स्थानी असून, चेतेश्वर पुजारा १९, तर मुरली विजय २० व्या स्थानी आहे. गोलंदाजीत डेल स्टेन सारखी ‘गन’ आफ्रिकेच्या भात्यात आहे. स्टेन जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. वर्नोन फिलँडर ७ व्या, मोर्ने मोर्कल ११, तर इम्रान ताहीर ५९ व्या स्थानी आहे. दुसरीकडे आश्विन ८ व्या स्थानी, ईशांत शर्मा १९, रवींद्र जडेजा ३०, अमित मिश्रा ३८व्या स्थानी आहे.
...तर भारत कसोटी क्रमवारीत दुसरा
By admin | Updated: November 4, 2015 01:28 IST