विशाखापट्टणम : क्षमतेनंतरही अनुभवी लेगस्पिनर अमित मिश्रा नेहमी संघ व्यवस्थापनाचा बळी ठरला आहे. ३३ वर्षांच्या अमितला इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीसाठी संघाबाहेर ठेवण्यात आले. २९ आॅक्टोबर रोजी त्याने याच मैदानावर न्यूझीलंडचे ५ फलंदाज १८ धावांत बाद केले होते. आॅक्टोबर २००८ साली मोहालीत आॅस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी कारकीर्द सुरू करणाऱ्या मिश्राने ८ वर्षांत केवळ २१ कसोटी आणि ३६ वन डे खेळले. निवडकर्ते आणि व्यवस्थापनाने त्याच्या क्षमतेवर कधीही विश्वास बाळगला नाही. यामुळेच तो नेहमी आतबाहेर होत राहिला. धोनी असो वा विराट कुठल्याही कर्णधाराने त्याची क्षमता ओळखली नाही. न्यूझीलंडविरुद्ध १५ बळी घेत मालिकावीर ठरलेला मिश्रा याने झिम्बाब्वेविरुद्ध एका मालिकेत १८ गडीदेखील बाद केले आहेत. पण अंतिम एकादशमधून कुठल्या स्पिनरला वगळण्याची वेळ आली की कुऱ्हाड कोसळते ती मिश्रावरच!संघातील दुसरा डावखुरा फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजा याने कारकिर्दीला २०१२ मध्ये सुरुवात केली. तो २२ कसोटी सामने खेळला. आॅफस्पिनर रविचंद्रन आश्विन याने नोव्हेंबर २०११ साली कारकिर्दीला प्रारंभ केला. सध्या तो ४१ वा कसोटी सामना खेळत आहे. मिश्राने ३६, जडेजाने १२६ आणि आश्विनने १०२ वन डे खेळले आहेत. विकेट घेण्याच्या बाबतीत आश्विनने २२३, जडेजाने ८८ तर मिश्राने ७४ बळी घेतले. संघव्यवस्थापनाने आश्विन आणि जडेजावर अधिक विश्वास टाकला; पण मिश्रावर नेहमी टांगती तलवार कायम ठेवली. माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी आपल्या स्तंभात मिश्राला वगळणे चुकीचे ठरेल, असे लिहिले होते. त्याला अधिक गोलंदाजी दिल्यास तो प्रभावी मारा करू शकतो, असेही संकेत दिले. राजकोटमध्ये दुसऱ्या डावात जे ३ इंग्लिश फलंदाज बाद झाले त्यातील २ बळी मिश्राचे होते. भारतीय संघाचे कोच अनिल कुंबळे स्वत: लेगस्पिनर आहेत. तरीही ते अनुभवी लेगस्पिनर मिश्राच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास बाळगत नाहीत. ८ वर्षांच्या कारकिर्दीत केवळ २१ कसोटीत खेळायला मिळणे हा कुठल्याही फिरकी गोलंदाजावर अन्यायच म्हणावा लागेल. (वृत्तसंस्था)
अमित मिश्रा ठरतोय संघ व्यवस्थापनाचा बळी!
By admin | Updated: November 18, 2016 00:09 IST