विश्व बुद्धिबळ : विश्वनाथन आनंदच्या आत्मविश्वासामुळे कार्लसन बुजलेला
जयंत गोखले -
जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेतील आजचा पाचवा डाव 39व्या चालीत बरोबरीत सुटला. एका परीने स्पर्धेचा निम्मा टप्पा आज पूर्ण होतोय, आनंद आणि कार्लसन दोघांनाही 6 डाव पांढरी मोहरी घेऊन खेळायला मिळणार, तर 6 डाव काळी मोहरी घेऊन खेळायचे आहे. आजच्या डावात आनंदने तिस:यांदा पांढरी मोहरी घेऊन खेळताना वजिराच्या पुढच्या डावाने सुरुवात केली.
चेन्नईमधील लढतीत आनंदने सुरुवात करताना दोन पद्धतींचा अवलंब केलेले आपण पाहिले होते. परंतु, या वेळी मात्र आनंदने एकाच पद्धतीने डावाची सुरुवात करण्यावर जोर दिला आहे. क्रॅमनिकला पराभूत करतानादेखील आनंदने याच डावपेचांचा उपयोग केला होता!
आनंदच्या या आत्मविश्वासामुळे कार्लसन किंचित बुजलेला दिसतोय. प्रत्येक वेळी काळी मोहरी घेऊन खेळताना कार्लसनने वेगवेगळ्या प्रकारे आनंदला प्रत्युत्तर द्यायचा प्रयोग केला आहे. पहिल्या डावात ‘ग्रनफील्ड बचाव’, तिस:या डावात ‘क्वीन्स इंडियन ग्रॅबीट’, तर आज ‘क्वीन्स इंडियन बचाव!’ आनंदची तयारी जबरदस्त आहेच आणि याचे प्रत्यंतर आजसुद्धा आले. कुठल्याही परिस्थितीत पटावरची स्थिती गुंतागुंतीची असेल आणि वेगळ्या प्रकारचा असमतोल निर्माण कसा करता येईल, यावर आनंदची भिस्त दिसून येतीय.
गुंतागुंतीच्या स्थितीमधले आनंदचे कौशल्य वादातीत आहे आणि डावाच्या मध्यभागावरची त्याची हुकूमत आज सर्वश्रेष्ठ समजली जाते. कार्लसनने 11व्या चालीपासूनच बचावात्मक धोरण स्वीकारून आनंदची मोहरी कमी करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला होता. सर्वतोपरी प्रयत्न करत, वेळप्रसंगी प्याद्याचे बलीदान देऊन आनंदने पूर्ण पटावर वरचष्मा राखण्यात यश मिळवले होते. डावाच्या केंद्रस्थानी डी 5 या घरातला आनंदचा उंट सर्व परिस्थितीवर नियंत्रण ठेवून होता. कार्लसनने त्याचे सर्व कौशल्य पणाला लावून डाव अंतिमावस्थेत नेला. कार्लसनने स्वत:कडे असलेले अतिरिक्त प्यादेदेखील परत करून टाकले आणि समसमान स्थिती मिळविली.
वरवर पाहता अगदी सोपा वाटणारा असा आजचा डाव अनेक ग्रँडमास्टर्सच्या डोक्याला खुराक देणारा ठरणार आहे. दोघांनीही इतक्या नावीन्यपूर्ण चाली आणि डावपेच दाखवले आहेत, की ज्यांचा उपयोग इतर असंख्य खेळाडूंना भविष्यात होणार आहे!
केवळ कार्लसनसारखा असामान्य प्रतिभेचा खेळाडू होता म्हणून आजचा डाव बरोबरीत सुटला आहे. आता विलक्षण उत्सुकता आहे, ती उद्या होणा:या 6व्या डावातल्या कार्लसनच्या पहिल्या खेळीची! सिसिलीयन बचावाचे आव्हान कार्लसन स्वीकारणार, की अजून काही नवीन गुपित आपल्या पोतडीतून बाहेर काढणार?
गुंतागुंतीच्या स्थितीमधले आनंदचे कौशल्य वादातीत आहे आणि डावाच्या मध्यभागावरची त्याची हुकूमत आज सर्वश्रेष्ठ समजली जाते.