हरारे : गोलंदाजांच्या अचूक मा-यानंतर कर्णधार एल्टन चिगुम्बुराच्या (नाबाद ५२) अर्धशतकी खेळीच्या जोरावर झिम्बाब्वेने ३१ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आॅस्ट्रेलियाचा वन-डे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात ३ गड्यांनी पराभव करण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. झिम्बाब्वेचा तिरंगी वन-डे सामन्यांच्या मालिकेतील हा पहिला विजय आहे, तर आॅस्ट्रेलियाचा हा दुसरा पराभव आहे. झिम्बाब्वेने या विजयासह आॅस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या लढतीत १९८ धावांनी झालेल्या पराभवाची परतफेड केली आणि अंतिम फेरी गाठण्याच्या आशा कायम राखल्या. झिम्बाब्वेने यापूर्वी ९ जून १९८३ रोजी तिसऱ्या विश्वकप स्पर्धेदरम्यान आॅस्ट्रेलियाचा १३ धावांनी पराभव केला होता. त्यानंतर झिम्बाब्वेला आॅस्ट्रेलियाचा पराभव करण्यासाठी ३१ वर्षे व २८ सामन्यांची प्रतीक्षा करावी लागली. झिम्बाब्वेने आज ऐतिहासिक विजयाची नोंद केली. झिम्बाब्वेने आॅस्ट्रेलियाचा डाव ५० षटकांत ९ बाद २०९ धावांत रोखला आणि विजयासाठी आवश्यक धावा ४८ षटकांत ७ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केल्या. कर्णधार एल्टन चिगुम्बुराने नाबाद अर्धशतकी खेळी करीत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. चिगुम्बुराने प्रॉस्पर उत्सेयाच्या (नाबाद ३०) साथीने आठव्या विकेटसाठी ९.४ षटकांत ५५ धावांची अभेद्य भागीदारी केली. उत्सेयाने मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर षट्कार ठोकत विजयावर शिक्कामोर्तब केले. झिम्बाब्वेने ऐतिहासिक विजयानंतर स्टेडियममध्ये जल्लोष केला. चिगुम्बुराने ६८ चेंडूंना सामोरे जाताना नाबाद ५२ धावांची खेळी केली. त्यात ४ चौकारांचा समावेश आहे. उत्सेयाने २८ चेंडूंमध्ये नाबाद ३० धावा फटकाविल्या. त्यात २ चौकार व १ षट्काराचा समावेश आहे. झिम्बाब्वेच्या विजयात सलामीवीर सिकंदर रजा (२२ धावा, ३२ चेंडू), हॅमिल्टन मस्काद््जा (१८ धावा, ३५ चेंडू) व ब्रँडन टेलर (३२ धावा, २६ चेंडू, ५ चौकार) यांचेही योगदान उल्लेखनीय ठरले. (वृत्तसंस्था)
तब्बल ३१ वर्षांनंतर...
By admin | Updated: September 1, 2014 01:42 IST