नवी दिल्ली : बीसीसीआयने स्थापन केलेली नवीन सल्लागार समिती लवकरच भारतीय संघासाठी प्रशिक्षकाचा शोध घेईल, असा विश्वास भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांना वाटतो. क्रिकेटला योग्य दिशेला घेऊन जाण्यासाठी बीसीसीआयच्या योजनाविषयी सर्वांनीच धैर्य ठेवण्याची आवश्यकता असल्याचेही या भारताच्या महान फलंदाजाने म्हटले आहे.अनेक टीकाकारांनी समितीत सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांची भूमिका नक्की काय असेल या विषयी प्रश्न उपस्थित केले आहेत. मात्र गावस्कर यांनी हा योग्य दिशेने घेतलेला निर्णय असल्याचे म्हटले आहे.ते म्हणाले, ‘‘बीसीसीआयला आयपीएलचे आयोजन करायचे होते. त्यामुळे त्यांना आयपीएलवर लक्ष द्यावे लागले हे स्पष्टच आहे. सर्वांनी हे लक्षात घ्यायला हवे. त्यांनासुद्धा कोणत्याही उच्चपातळीवर नियुक्ती होण्याविषयी घाई नव्हती. त्यांनी आता समितीची नियुक्ती केली आहे. निश्चितचपणे ते क्रीडाजगताकडून काही मार्गदर्शनाची अपेक्षा करीत आहे आणि त्यामुळे त्यांनी ही तीनसदस्यीय समिती नियुक्त केली. आता ते याविषयी लवकरच निर्णय घेतील. बांगलादेशचा तीन आठवड्यांचा दौरा समाप्त होताच भारताला एक प्रशिक्षक मिळेल.’’भारतीय संघाचे संचालक रवी शास्त्री यांच्या संघाच्या भवितव्याशी संलग्नित प्रश्नाला उत्तर देताना गावस्कर यांनी आपला कोणा एका व्यक्तीविषयी रोख नाही; परंतु आता हा प्रश्न या तीन लोकांसाठी आहे. ज्यांची नियुक्ती बीसीसीआयने केली आहे.(वृत्तसंस्था)
सल्लागार समिती लवकरच प्रशिक्षकाचा शोध घेईल : गावसकर
By admin | Updated: June 4, 2015 01:16 IST