वडोदरा : रणजी करंडकावर ४० वेळा नाव कोरणाऱ्या मुंबई संघावर स्पर्धेतून बाहेर जाण्याची वेळ ओढावली आहे. सहा सामन्यांत केवळ एकच विजय मिळवणाऱ्या मुंबईला आव्हान टिकवण्यासाठी यापुढील प्रत्येक सामना जिंकणे आवश्यक आहे. त्यात हे शिवधनुष्य यशस्वीपणे पेलण्याची जबाबदारी नवनिर्वाचित कर्णधार आदित्य तरे याला पार पाडावी लागेल. सूर्यकुमार यादव याने कर्णधारपद तडकाफडकी सोडल्यामुळे आदित्यकडे ती जबाबदारी सोपविण्यात आली आणि गुरुवारपासून सुरू होत असलेल्या बडोद्याविरुद्धच्या लढतीत त्याच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. सहा सामन्यांत बडोदा संघाला केवळ एकच विजय मिळवता आला आहे, परंतु त्यांनी एकाही लढतीत पराभव पत्करला नसल्यामुळे त्यांच्या खात्यात १८ गुण जमा आहेत. दुसरीकडे मुंबईला सहा सामन्यांत एक विजय आणि दोन पराभव पत्करावे लागले आहेत. त्यामुळे त्यांना ११ गुणांवर समाधान मानावे लागले़ तामिळनाडूकडून झालेल्या मानहानिकारक पराभवामुळे मुंबईचे मनोबल खचले आहे आणि त्यात नेतृत्वबदलामुळे संघाला यातून सावरण्यास अधिक काळ लागू शकतो. अशा परिस्थितीत बडोदा संघाशी त्यांच्याच घरच्या मैदानावर मुंबईला दोनहात करायचे आहेत. या सामन्यावर आदित्यच्या नेतृत्वासह फलंदाजीवरही साऱ्यांच्या नजरा असतील. त्यामुळे नेतृत्वाबरोबर आदित्यला फलंदाजीतही आपली उपयुक्तता सिद्ध करावी लागणार आहे.
बडोद्याविरुद्ध आदित्यच्या नेतृत्वाची कसोटी
By admin | Updated: January 29, 2015 06:40 IST