रिओ : येथे सुरू असलेल्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी चांगली कामगिरी केली आहे. पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात गुरुवारी अभिषेक वर्माने सुवर्ण तर सौरभ चौधरीने कांस्यपदक जिंकले. अंतिम फेरीत अभिषेक वर्माने २४४.२ तर सौरभ चौधरीने २२१.९ गुणांची कमाई केली.
तुर्कीच्या इस्माईल केलेसने २४३.१ गुणांसह रौप्यपदक कमावले. सौरभने यंदा पाच सुवर्णांची कमाई केली असून वर्षभरातील हे त्याचे सहावे आयएसएसएफ विश्वपदक होते. भारत पदकतालिकेत दोन सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य पदकासह अव्वल स्थानावर कायम आहे. चिंकी यादव २५ मीटर महिला पिस्तुलमध्ये अंतिम पात्रता मार्कपासून एका गुणाने माघारली. ती ५८४ गुणांसह दहाव्या स्थानी आली.अनुराज सिंग ५७९ गुणांसह २५ व्या आणि अभिज्ञा पाटील ५७२ गुणांसह ५३ व्या सञथानावर राहीली. चैनसिंग आणि पारूल कुमार यांना ५० मीटर रायफल थ्रो पोझिशनमध्ये क्रमश: ४९ आणि ५७ वे स्थान मिळाले. महिलांच्या २५ मीटर पिस्तुल प्रकारात राही सरनोबत आणि मनू भाकर यांनी क्रमश: ५८० आणि ५८३ गुणांची कमाई केली. दोघींनीही आधीच आॅलिम्पिक कोटा मिळविला आहे. स्वप्निल कुसाळे व ऐश्वर्यसिंग यांनी पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्रो पोझिशनमध्ये ११६६ आणि ११६५ गुण संपादन केले. (वृत्तसंस्था)१० मीटर एअर पिस्तुल प्रकारात अभिषेक आणि सौरभ या दोन्ही भारतीय खेळाडूंनी आॅलिम्पिक प्रवेश याआधीच निश्चित केला आहे. याव्यतिरीक्त संजीव राजपूत याने ५० मीटर रायफल थ्रो पोझिशन अंतिम फेरीमध्ये रौप्य जिंकून आगामी आॅलिम्पिक स्पर्धेचे तिकीट पक्के केले आहे.