नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांत ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत आणि भालाफेक क्रीडा प्रकारात भारतीयांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार प्रगती केली आहे. याच कामगिरीकडे पाहून भारतीय अॅथ्लेटिक्स महासंघाने (एएफआय) या दोन खेळांच्या नव्या राष्ट्रीय स्पर्धांची घोषणा केली. महासंघाच्या कार्यकारी परिषद सदस्यांनी या निर्णयाची अधिकृत घोषणा केली. ‘सध्या अशा क्रीडा प्रकारांवर अधिक लक्ष देणे गरजेचे आहे, ज्यामध्ये भारतीयांची प्रगती चमकदार आहे,’ असे मत एएफआयचे अध्यक्ष आदिल सुमारिवाला यांनी व्यक्त केले. सुमारिवाला पुढे म्हणाले, की ‘‘भारतीय धावपटू सातत्याने ४०० मी. आणि ४०० मी. रिले स्पर्धेत चांगली कामगिरी करीत आहेत. त्याचबरोबर देशाच्या भालाफेकपटूंनीही आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपली छाप पाडली आहे. याचे सध्या युवा भालाफेकपटू नीरज चोप्रा उत्तम उदाहरण आहे. तो भालाफेक स्पर्धेत भारताचे भविष्य असून, तो नक्कीच भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी करेल. यामुळेच आपल्याला मजबूत गोष्टींवर लक्ष देण्याची गरज आहे.’’
४०० मी. व भालाफेकीच्या नव्या राष्ट्रीय स्पर्धा होणार
By admin | Updated: February 26, 2017 23:56 IST