नवी मुंबई : करावे येथे राहणाऱ्या तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी घडली आहे. परंतु हा प्रकार तरुण ज्याठिकाणी जेवायला जायचा त्या शेजारच्या घरात घडला आहे. त्यामुळे त्याची हत्या झाल्याचा आरोप मयत तरुणाच्या कुटुंबीयांनी केला असून याप्रकरणी एनआरआय पोलीस अधिक तपास करत आहेत.अमित राय (२५) असे मयत तरुणाचे नाव असून तो करावे येथे मित्रांसोबत भाड्याच्या घरात राहायला होता. गेल्या दीड वर्षापासून तो शेजारच्या किशोर ढोबळे यांच्या घरी खानावळीमध्ये जेवायला होता. रविवारी दुपारी देखील तो नेहमीप्रमाणे त्यांच्या घरी जेवायला गेला होता. यावेळी ढोबळे यांच्या पत्नी व दोन वर्षाची मुलगी घरात होती. दरम्यान अमित हा काही वेळासाठी टीव्ही पाहत असल्याने ढोबळे यांच्या पत्नी मुलीला आंघोळ घालायला गेल्या होत्या. काही वेळाने स्रानगृहातून बाहेर आल्या असता अमित याने गळफास घेतल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यानुसार त्याच्या आत्महत्येची नोंद एनआरआय पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. शनिवारी रात्रीच अमित हा गावी घरच्यांसोबत फोनवर बोलला होता. त्यावेळी तो कुठल्याही दडपणात असल्याचे जाणवले नाही असे त्याचे नातेवाईक अशोक शर्मा यांनी सांगितले. शिवाय तो आत्महत्या करेल असे कसलेच ठोस कारण नसल्यामुळे त्याची हत्या झालेली असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. आत्महत्या करायची तर स्वत:च्या राहत्या घराऐवजी दुसऱ्याच्या घरात गळफास का घेईल असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, अमितचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पालिका रुग्णालयात पाठवला असून त्याचा अहवाल आल्यानंतर प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
तरुणाची शेजारच्या घरात आत्महत्या
By admin | Updated: August 8, 2016 02:38 IST