नवी मुंबई : एकतर्फी प्रेमातून तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना कोपरखैरणे येथे घडली. सदर तरुणाने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्याचे प्रेम असलेल्या तरुणीसोबत पुनर्जन्मात भेटीची इच्छा व्यक्त केली आहे. याप्रकरणी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.सोमन्ना पुजारी (२२) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो मूळचा सांगलीच्या उमदी गावचा असून कोपरखैरणे सेक्टर १ येथे मित्रांसोबत भाड्याच्या घरात राहायला होता व खाजगी कारवर तो चालकाचे काम करायचा. बुधवारी संध्याकाळी घरात एकटा असताना त्याने गळफास लावून आत्महत्या केली. रात्री त्याचे सहकारी मित्र घरी परत आले असता दरवाजा आतून लावलेला होता. यामुळे त्यांनी खिडकी उघडून पाहिली असता आतमध्ये सोमन्ना याचा मृतदेह पंख्याला लटकलेला दिसला. घटनेची माहिती मिळताच कोपरखैरणे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सोमन्ना याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या दोन चिठ्ठ्या पोलिसांच्या हाती लागल्या. यामध्ये त्याने प्रेमप्रकरणातून आत्महत्या करीत असल्याचे लिहिले असून आत्महत्येला कोणी जबाबदार नसल्याचेही म्हटले आहे. त्यापैकी एका चिठ्ठीत त्याने ‘मला माफ कर, मी तुला सोडून चाललो आहे, जर पुढचा जन्म असेल तर तुझा चांगला नवरा होईन मी,’ असे लिहिलेले आहे. तर दुसऱ्या चिठ्ठीत स्वत:च्या इच्छेने आत्महत्या करत असून मृत्यूनंतर प्रेयसीने मातीला यावे, अशी अंतिम इच्छाही व्यक्त केली आहे. सहाय्यक निरीक्षक आर. एच. अहिरे याप्रकरणी तपास करत आहेत.
एकतर्फी प्रेमातून तरुणाची आत्महत्या
By admin | Updated: December 18, 2015 00:37 IST