नवी मुंबई : पत्नीने पतीची गळा दाबून हत्या केल्याची घटना महापे येथे घडली आहे. पतीने न विचारता नणंदेला आर्थिक मदत केल्यावरून त्यांच्यात महिन्यापासून भांडण सुरू होते. शवविच्छेदनात हत्येचा उलगडा झाल्यानंतर पोलिसांनी पत्नीला अटक केली आहे.संजय काळे (३२) असे हत्या झालेल्या पतीचे नाव असून तो कळवा येथील राहणारा आहे. त्याला दोन बहिणी असून एक विवाहित तर दुसरी अविवाहित आहे. या बहिणींना तो पत्नीपासून लपवून आर्थिक मदत करत होता. नुकतेच त्याने एका बहिणीला दीड लाख रुपयांची मदत केली होती. ही बाब पत्नी आशा काळे हिला समजली होती. त्यामुळे न विचारता नणंदेला पैसे दिल्याच्या कारणावरून ती पतीसोबत भांडत होती. गेले महिनाभर त्यांच्यात यावरून वाद सुरू होता. अखेर चार दिवसांपूर्वी ती पतीला घेवून महापे येथील भावाच्या घरी आली होती. त्याठिकाणी दारू पिल्याने संजयची प्रकृती बिघडली होती. यामुळे त्याला रुग्णालयात नेण्यासाठी भाऊ रिक्षा आणायला गेला असता आशा हिने पतीचा गळा आवळून हत्या केली. परंतु पतीचा मृत्यू नैसर्गिक असल्याचा दिखावा केला होता. मात्र शवविच्छेदन अहवालात त्याचा मृत्यू गळा दाबून झाल्याचे उघड झाले. यामुळे पत्नीकडे चौकशी केली असता तिने हत्येची कबुली दिल्याचे वरिष्ठ निरीक्षक चंद्रकांत काटकर यांनी सांगितले.याप्रकरणी आशा काळे हिच्यावर रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली आहे. तिचा कळवा येथे दारू विक्रीचा व्यवसाय असल्याचे समजते.
महापेमध्ये पत्नीने केली पतीची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 02:38 IST