ठाणे : स्मार्ट सिटी बरोबर नगरसेवकांनाही स्मार्ट बनविण्यासाठी, पालिका प्रशासनाने नगरसेवकांच्या हाती टॅब दिले होते. परंतु, एक वर्ष उलटूनही ते काही केल्या कोणाकडे दिसत नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे ते गेले कुठे असा सवाल मात्र उपस्थित झाला आहे. या टॅबच्या माध्यमातून संपूर्ण महासभा आणि स्थायी समितीची बैठक पेपरलेस करण्याचा दावा पालिकेने केला होता. यासाठी ५४ लाखांचा खर्चही केला आहे. परंतु, आजही त्यांचा वापर होऊ न शकल्याने त्यांचे करायचे काय असा प्रश्न पालिकेला सतावू लागला आहे. मागील वर्षी ठाणे महापालिकेने महासभा आणि स्थायी समितीच्या विविध कार्यक्रम पत्रिकांच्या कागदांवर होणारा खर्च टाळण्यासाठी टॅबची संकल्पना पुढे आणली होती. त्यानुसार १३५ नगरसेवकांसाठी ते वितरीत केले. त्यातील १२ नगरसेवकांनी ते नाकारले आहेत. परंतु, आजही त्यावर पालिकेने एकही अपडेट टाकलेले नाहीत. विशेष म्हणजे सुरुवीताला नवीन म्हणून काही नगरसेविका महासभेला टॅब आणत होत्या. परंतु आता ते ही गायब झाले आहेत. अखेर मागील महासभेत उशिरा गोषवारे मिळत असल्याचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर पुढील महासभेपासून टॅबवर ते उपलब्ध करुन दिले जातील, असे आश्वासन पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले होते. परंतु अद्यापही ही प्रक्रिया सुरु झालेली नाही.
नगरसेवकांचे टॅब गेले कुठे ?
By admin | Updated: December 10, 2015 01:53 IST