अनिकेत घमंडी, डोंबिवली सुमारे १६ लाख कल्याण-डोंबिवलीकरांवर पावसाळा पूर्ण होईस्तोवर पाणीकपातीचे संकट ओढावणार नसल्याने त्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे. परंतु, त्यानंतर मात्र जलसिंचन विभागाने निर्णय घेतल्यास गतवर्षीपेक्षाही जास्त पाणीकपात होणार आहे. महापालिका हद्दीत सध्या २७ गावे धरून दिवसाला सुमारे ३५० दशलक्ष लीटर पाणी वितरित केले जाते. त्या गावांना एमआयडीसीकडून पाणीपुरवठा केला जातो. ती वगळता महापालिकेकडून सुमारे ३०५-१० एमएलडी पाणी वितरित केले जाते. या ठिकाणी पाणीपुरवठा करणाऱ्या आंध्र आणि बारवी या दोन्ही धरणांमध्ये पाणीसाठा खालावलेला असून, एका ठिकाणी अवघा ३५/४० टक्के तर दुसऱ्या ठिकाणी केवळ ५६ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याचीही माहिती मिळाली. महापालिका हद्दीत सुमारे ६५हून अधिक जलकुंभांमधून पाणीपुरवठा केला जातो. तसेच सुमारे ७० हजारांहून अधिक पाणी मीटर असल्याची माहिती विभागाकडून मिळाली. एकूण पाण्यापैकी सुमारे १५० एमएलडी पाणी उल्हास नदीच्या पात्रातून, ९०-९५ दशलक्ष लीटर पाणी एमआयडीसी देते. तर अन्य ७ दशलक्ष लीटर पाणी टिटवाळ्याच्या माध्यमातून मिळते. एमआयडीसी स्वत: पाणी शुद्ध करून देते. तसेच उल्हास नदीचे पाणी व टिटवाळ्याचे पाणी शुद्धीकरण करण्यासाठी बारवे जलशुद्धीकरण केंद्राचा वापर करण्यात येत असून, त्या ठिकाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया होते. त्यानंतर पाण्याचे वितरण केले जाते. वितरणाचे आणखी काही नवीन जलकुंभ बांधले असून, त्यातूनही पाणी वितरित करण्याबाबतची तयारी अंतिम टप्प्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. पाणीगळतीला चाप लावून त्या ठिकाणी आगामी काळात हजारो मीटर लावण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.
गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी
By admin | Updated: September 2, 2015 02:03 IST