जूनमध्ये दमदार बरसलेल्या वरुणराजाने १० ते १५ दिवसांपासून दडी मारली आहे. त्यामुळे ठाणे जिल्हा पाणीबाणीच्या उंबरठ्यावर आहे. जिल्ह्यातील एमआयडीसीसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणात २० ते २५ दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक आहे. पावसाअभावी बळीराजादेखील चिंतातुर असून लवकर पाऊस न झाल्यास संकट ओढावणार आहे.जूनमध्ये जिल्ह्यात सरासरी ४५५ मिलिमीटर पावसाची नोंद होती. यंदा जून महिन्यात अपुरा पाऊस होईल, हा अंदाज साफ फोल ठरवून काहीशा उशिरा आगमन झालेल्या पावसाने प्रत्यक्षात जोर धरला आणि महिन्याची सरासरी सहज ओलांडली. सर्वाधिक ७८८ मिमी (सरासरीच्या १४५ टक्के) पाऊस ठाण्यात, तर सर्वात कमी ३५६ मिमी (९४ टक्के) मुरबाड तालुक्यात झाला. पाऊस न झाल्याने पाण्याचे संकट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.बारवी धरणात सध्या २३.८० दशलक्ष घनमीटर साठा शिल्लक असून तो २० ते २५ दिवस पुरेल, असा लघुपाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांचा दावा आहे. गेल्या वर्षीच्या नियोजनानुसार जुलैच्या मध्यापर्यंत पाणी पुरविण्यात या विभागाला यश आले. परंतु, आता पाऊस न झाल्यास परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते.
पाऊस न झाल्यास जिल्ह्यावर पाण्याचे संकट
By admin | Updated: July 8, 2015 22:25 IST