पनवेल : सिडकोच्या खारघर, तळोजा, द्रोणागिरी, उलवे, कळंबोली आदी वसाहतीत पाणीपुरवठा करणाऱ्या हेटवणे धरणात जवळपास नव्वद टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यंदा राज्यात कमी पावसामुळे सर्वत्र पाण्याची टंचाई जाणवत आहे. या संपूर्ण बाबींचा विचार करून सिडकोने वीस टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला आहे. खारघर, तळोजा, उलवे, द्रोणागिरी, वसाहतीच्या हेटवणे धरणातून सध्या शंभर एमएलडी पाणीपुरवठा होतो. मात्र त्यात २० टक्के गळती होते. त्यामुळे प्रत्यक्षात वसाहतीत ८० एमएलडी पाणीपुरवठा होतो. परिसरात होणाऱ्या अपुरा पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे मोर्चे, आंदोलन नियमित सुरु आहे. खारघरला ८०, तळोजाला १० आणि द्रोणागिरीला ७ एमएलडी पाण्याची गरज आहे. मात्र अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे या वसाहतीत पाच ते दहा एमएलडी पाणीपुरवठा कमी होत असताना पुढील महिन्यापासून पाणी वीस टक्क्यांनी कपात केली जाणार आहे.त्यामुळे नागरिकांना पाण्याचा जपून वापर करावा लागणार आहे. बांधकाम साईटच्या नळ जोडण्या बंद करणार !सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाने खारघर,तळोजा परिसरात काही ठिकाणी सिडकोने बांधकाम साईटवर काम करणाऱ्या कामगारांसाठी नळ जोडण्या दिल्या आहेत. मात्र बांधकाम विकासक सदर पाण्याचा वापर बांधकामासाठी करीत असल्याने तसेच खारघरच्या सेक्टर अकरामधील जलकुंभातून टँकरद्वारे रोज हजारो लिटर पाणी अल्प दरात घेवून विक्र ी करीत असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेवून सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाने नळ जोडणी बंद करण्याची नोटीस बजावली आहे, तर टँकरद्वारे केला जाणारा पाणीपुरवठा बंद करण्याचा विचार करीत असल्याचे समजते .
सिडको वसाहतीत पाणीकपात
By admin | Updated: October 28, 2015 23:32 IST