नामदेव मोरे, नवी मुंबईसिडकोने वाशीमध्ये बांधलेल्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनी केंद्राची एक वर्षामध्ये दुरवस्था झाली आहे. प्रदर्शनी हॉलमध्ये प्रचंड धूळ साचली आहे. इमारत परिसरामध्ये कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. देखभाल करण्यासाठी योग्य यंत्रणा कार्यान्वित करण्यातही सिडकोस अपयश आले आहे. वाशी रेल्वे स्टेशनसमोर महामार्गाला लागून ७ हेक्टर जमिनीवर सिडकोने आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रदर्शन केंद्र उभे केले आहे. जवळपास २५६ कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या या वास्तूचे उद्घाटन ४ सप्टेंबर २०१४ ला तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते केले होते. देशातील पाच उत्कृष्ट केंद्रांमध्ये हे एक असल्याचा दावा सिडको प्रशासनाने केला होता. अत्यंत आकर्षक संकल्पचित्राचे सादरीकरण केले होते; परंतु प्रत्यक्षात मात्र या केंद्राची योग्य देखभाल करणे सिडकोला शक्य झालेले नाही. अद्याप देखभालीसाठी ठेकेदाराचीही नियुक्ती केली नाही. वातानुकूलित प्रदर्शन केंद्र, पहिल्या मजल्यावरील प्रदर्शन हॉलमध्ये प्रचंड धूळ साचली आहे. नियमित साफसफाई होत नसल्यामुळे कबुतरांनी वास्तव्य केले आहे. प्रदर्शनी केंद्राच्या परिसरात कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. अनेक महिन्यांपासून कचरा उचललेला नाही. पावसाळ्यात वाढलेले गवतही काढलेले नाही. फक्त बिझनेस सेंटरचीच नियमित साफसफाई केली जात आहे. प्रदर्शनी केंद्राच्या इमारतीमध्ये भटक्या कुत्र्यांनी आश्रय घेण्यास सुरुवात केली आहे. वाशी गावाकडून इमारतीकडे येणाऱ्या रोडवर डेब्रीज पडले आहे. गेटच्या बाहेर पदपथावर विद्युत डीपी उघडी पडली आहे. बाहेर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्यामुळे हा परिसर बकाल होऊ लागला आहे. मोठ्या वातानुकूलित हॉलचे एक दिवसाचे भाडे जवळपास साडेआठ लाख रुपये आहे. साध्या हॉलचे भाडेही जवळपास सव्वादोन लाख रुपये आहे. प्रदर्शनी केंद्राचे भाडे प्रचंड असल्यामुळे त्याला प्रतिसादही योग्य मिळत नाही. संकल्पचित्राप्रमाणे इमारत उभी राहिली आहे. परंतू त्याची देखभाल व परिसराचे सुशोभीकरण मात्र योग्यपद्धतीने झालेले नाही. एक वर्षात या प्रकल्पाची दुरवस्था झाली आहे. अशीच स्थिती राहिली तर पुढील काही वर्षांत प्रदर्शन केंद्राचे खंडर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (प्रतिनिधी)प्रदर्शनी केंद्राच्या देखभालीविषयी माहिती घेण्यासाठी सिडको प्रशासनाशी संपर्क साधला असताना बिझनेस सेंटरची देखभाल व साफसफाई रोज केली जाते. प्रदर्शनी हॉलची नियमित साफसफाई करण्याची गरज नाही. जेव्हा प्रदर्शन असेल तेव्हा सफाई केली जाते. बाहेरील परिसर मनपाच्या ताब्यात असल्यामुळे साफसफाईची जबाबदारी त्यांची असल्याची प्रतिक्रिया देण्यात आली.
प्रदर्शन केंद्रामध्ये कचऱ्याचे दर्शन
By admin | Updated: October 28, 2015 23:37 IST