नवी मुंबई : स्थायी समिती सभापती निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतरही सत्ताधारी व विरोधी पक्षातील सदस्यांचे मोबाइलवर संभाषण सुरूच होते. मोबाइलवरून मतदान कोणाला करायचे याविषयी दबाव आणला जात असण्याची शक्यता वर्तविली जात असून पीठासन अधिकाऱ्यांनीही याकडे दुर्लक्ष केल्याने नाराजी व्यक्त केली आहे. निवडणुका चांगल्या वातावरणामध्ये व नि:ष्पक्षपणे पार पाडण्यासाठी निवडणूक विभागाने आचारसंहिता तयार केली आहे. महापालिका, विधानसभेपासून लोकसभेपर्यंत कोणत्याही निवडणुकीसाठी मतदान केंद्रामध्ये गेल्यानंतर मोबाइल फोनचा वापर करता येत नाही. पालिकेच्या सभागृहामध्येही मोबाइलचा वापर केला जावू नये असे अपेक्षित असते. परंतु स्थायी समिती सभापती निवडणुकीच्यावेळी सर्वच राजकीय पक्षातील सदस्यांकडून मतदानाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतरही मोबाइलचा वापर सुरू होता. निवडणुकीत निर्णायक मत ठरलेल्या मीरा पाटील या वारंवार मोबाइलवर कोणाशीतरी चर्चा करीत होत्या. राष्ट्रवादी काँगे्रसचे उमेदवार व सभागृह नेते जयवंत सुतार हे सुद्धा वारंवार कोणाशीतरी मोबाइलवर बोलत होते. वास्तविक एकदा निवडणुकीसाठी मतदानाची प्र्रक्रिया सुरू झाल्यानंतर तिथे निवडणुकीचे कामकाज वगळता इतर कोणत्याही गोष्टीवर संभाषण करणे योग्य नाही. बाहेरील व्यक्तींशी संपर्क साधणे आचारसंहितेमध्ये बसत नाही. (प्रतिनिधी)
मतदान केंद्रात मोबाइलचा वापर
By admin | Updated: May 14, 2016 01:14 IST